उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी 25 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

सोलापूर, दि. 13(जिमाका)
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने *”डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” तसेच *”डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक – ग्रंथमित्र पुरस्कार”देण्यात येतात.
राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे
रु. 1 लाख, रु. 75 हजार, रु. 50 हजार आणि रु. 25 हजार* अशी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच राज्यस्तरावर एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी *रु. 50 हजार* रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट दिली जाणार आहे. याशिवाय प्रत्येक महसुली विभागातील एका उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्त्यास व एका उत्कृष्ट ग्रंथालय सेवकास प्रत्येकी रु. 25 हजार* रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात येईल.
सन 2025-26 या वर्षासाठी पुरस्कारासाठी इच्छुक असलेल्या ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक – ग्रंथमित्र यांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये 25 सप्टेंबर 2026 पर्यंत आपल्या जिल्ह्यातील */जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे* सादर करावेत.
पुरस्कारासाठी पात्र असलेल्या ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवकांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



