महान राष्ट्रीयता निर्माणासाठी मोजावी लागते किंमत
रा. स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ : 'मंत्र छोटा तंत्र सोपे' पुस्तकाचे प्रकाशन

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार-पाच पिढ्यांनी खस्ता खाल्ल्यानंतर राष्ट्रसंघाचे काम आज देशभरात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. महान राष्ट्रीयता निर्माण करण्यासाठी किंमत मोजावी लागते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले. जेष्ठ स्वयंसेवक ऍड. रामभाऊ देशपांडे यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी लिहलेले ‘मंत्र छोटा तंत्र सोपे’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी श्री. हिरेमठ यांच्याहस्ते शिवस्मारक सभागृहात झाले.

याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ विधिज्ञ धनंजय माने, शिरीष कुलकर्णी, लेखक ऍड. रामभाऊ देशपांडे उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. हिरेमठ म्हणाले, ऍड. रामभाऊ देशपांडे यांचा स्वभाव मृदू असून त्यांना संपर्काची प्रचंड आवड आहे. त्यांचा बोलका स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य असून बुद्धिमत्ता, नम्रता त्यांच्या ठायी आहे. अनेक संस्थांच्या उभारणीसाठी त्यांनी विलक्षण प्रयत्न केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची दृष्टी, चिंतन, व्यवहार कसा असावा यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे.
ऍड. रामभाऊ देशपांडे यांच्यासारख्या हजारो अतिशय प्रामाणिक आणि निष्ठावंत स्वयंसेवकांनी रा. स्व. संघाच्या माध्यमातून देशाची सेवा केली आहे. राष्ट्र आणि समाजाला प्रथम प्राधान्य देण्याचा संदेश या पुस्तकातून देण्यात आला आहे, असेही सुहासराव हिरेमठ यांनी सांगितले. याप्रसंगी लेखक ऍड. रामभाऊ देशपांडे, ऍड. धनंजय माने, शिरीष कुलकर्णी, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, डॉ. अनिल सर्जे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पुस्तकासाठी लेखन करणारे श्रीकांत जोशी यांचाही सत्कार करण्यात आला.
लेखकाचे मनोगत अनन्या देशपांडे यांनी सादर केले. पुस्तक परिचय शिरिष कुलकर्णी यांनी करून दिला. ऍड. आनंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर ऍड. श्रुती बडवे यांनी आभार प्रदर्शन केले.
———
चौकट
डॉ. हेडगेवारांनी घरातील पाट मोडून बनवला चहा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी अतिशय कष्टाने रा. स्व. संघाचे काम वाढवले. चहा करायला सरपण नसल्याच्या काळात त्यांनी एके दिवशी घरातील पाट मोडून त्याचेच सरपण बनवून स्वयंसेवकांना चहा तयार करून दिल्याची आठवण ऍड. रामभाऊ देशपांडे यांनी यावेळी भावुक होत सांगितली.



