24 तासांत खुनाचा छडा; तीन आरोपी जेरबंद ! एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी…

सोलापूर :
नवीन जिंदगी परिसरात तरुणाचा खून करून पसार झालेल्या तीन आरोपींना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अवघ्या 24 तासांत जेरबंद केले. या कारवाईमुळे खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर मौलाली बिराजदार (वय 20, व्यवसाय इलेक्ट्रिशियन, रा. प्लॉट नं. 91, कस्तुरबा नगर, नई जिंदगी, सोलापूर) याचा दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने डोक्यात, गळ्यावर तसेच हातावर वार करून खून केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकुंट रोडवरील बी.एस.एन.एल. टॉवरजवळील फुटपाथवर तीन संशयित इसम थांबले असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी मनसुरअली नदाफ (वय 22, रा. घर नं. 37, सिद्देश्वर गांधी नगर भाग-5, नई जिंदगी, सोलापूर), आहद इक्बाल सय्यद (वय 22, रा. घर नं. 108, मजरेवाडी, सोलापूर) आणि अविनाश दशरथ चव्हाण (वय 20, रा. घर नं. 04, बापूजी नगर, मुळेगाव रोड, नई जिंदगी, सोलापूर) या तीन आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी जुन्या वादातून उमर बिराजदार याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे समोर आले. हल्ल्यात उमर याच्या डोक्यात, गळ्यावर व हातावर वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून खुनासाठी वापरलेले हत्यार तसेच सुमारे 70 हजार रुपये किमतीची एक हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त अरुण देवकर, सहायक पोलीस आयुक्त विभाग-2 बी. एस. बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. बिराजदार, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख प्रकटीकरण पथकातील कर्मचारी
पोलीस अंमलदार राकेश पाटील, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, सचिन भांगे, दिलीप विधाते, आमसिध्द निंबाळ, अविनाश शिंदे, अविनाश डिगोळे, सचिन लवटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्हाण, कुमार बोल्ली, सकलेन मुकादम, अमोल खरटमल, राहुल सुरवसे, अय्याज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांनी यशस्वीपणे पार पाडली.
24 तासांत खुनाचा तपास लावून तीन आरोपींना जेरबंद केल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.



