अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावास
सहआरोपीला 3 वर्षांची शिक्षा; माळशिरस न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

माळशिरस :
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपीला 20 वर्षे सश्रम कारावासाची, तर सहआरोपीला 3 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मा. एल. डी. हुली, जिल्हा व सत्र न्यायाधीश-2, माळशिरस यांच्या न्यायालयाने 7 ऑगस्ट 2026 रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 785/2023 अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम 363, 376(2)(N), 34 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8, 12 व 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी स्पेशल पोक्सो केस क्रमांक 08/2024 अंतर्गत झाली.
या प्रकरणातील आरोपी तसलीम ताजुद्दीन शेख याला भा.दं.वि. कलम 363 सह कलम 34 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
तर आरोपी अमर रहीम शेख याला भा.दं.वि. कलम 363 सह कलम 34 अन्वये 3 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड, तसेच पोक्सो कायदा कलम 4 अन्वये 20 वर्षे सश्रम कारावास व 7 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जी. बी. चौधरी यांनी केला. न्यायालयीन कामकाजात सरकारी अभियोक्ता अॅड. संग्राम पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद करत शासन पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली.
या प्रकरणाच्या तपासासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीरज उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
न्यायालयीन पैरवी अधिकारी म्हणून पोसई विजय जाधव यांनी समन्वयाचे काम पाहिले. तसेच पोहेकॉ/1430 तांबोळी आणि पोकॉ/1053 हांगे यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली.
“अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांबाबत सोलापूर ग्रामीण पोलीस शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत असून, अशा गुन्ह्यांतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी तपास व सक्षम न्यायालयीन पैरवी करण्यास पोलीस दल कटिबद्ध आहे.”
— अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण



