दमाणी रक्तसंकलन केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक युफोरिया यंत्र रुग्णांच्या सेवेत दाखल
रुग्णांना कमी वेळेत होणार सुरक्षित रक्तपुरवठा : यंत्राची पूजा करून झाले उद्घाटन

सोलापूर : प्रतिनिधी
रुग्णांना कमी वेळेत सुरक्षित रक्तपुरवठा व्हावा याकरिता दमाणी रक्तसंकलन केंद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे युफोरिया ४.१ हे यंत्र रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. महाराष्ट्र रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून देणगी स्वरूपात प्राप्त झालेल्या या यंत्राचे शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
रुग्णाच्या रक्ताचा नमुना घेतल्यानंतर एचआयव्ही, हिपॅटॅटीस बी, हिपॅटॅटीस सी, सिफिलिस अशा चाचण्या करण्यासाठी चार तासांचा अवधी लागतो. हा चार तासांचा अवधी कमी करून केवळ अडीच तासांमध्ये या चाचण्या करता याव्यात याकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असलेले युफोरिया ४.१ हे यंत्र दमाणी रक्तसंकलन केंद्रात आणण्यात आले आहे.
युफोरिया ४.१ या यंत्रामुळे चाचण्या अचूक होणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे. तसेच रुग्णांना अल्पवेळेत सुरक्षित रक्तपुरवठा करणेही शक्य होणार आहे. अशा प्रकारचे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले यंत्र सोलापुरात प्रथमच दमाणी रक्तसंकलन केंद्रात दाखल झाले आहे. या यंत्राच्या उद्घाटनप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, सचिव जयेश पटेल, सहसचिव कुशल देढिया, संचालक सी.ए. राजगोपाल मिणियार, डॉ. सुहासिनी शहा, प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, किशोर चंडक, राजू वोरा, डॉ. श्रीकांत कामतकर, रमेश डाकलिया, राजीव देसाई, गुरुलिंग कन्नूरकर, किरण राठी, रोशन भुतडा, भाविन रांभिया, प्रशासकीय अधिकारी अशोक नावरे आदी उपस्थित होते.



