india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूरच्या हातमाग उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न

आमदार देवेंद्र कोठे : राष्ट्रीय हातमाग दिवस उत्साहात

 

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरातील विणकर बांधवांच्या कौशल्याचा उपयोग त्यांच्या अर्थार्जनासाठी व्हावा आणि सोलापूरची उत्पादने राज्यभर तसेच देशभरात विकली जावीत यासाठी सोलापूरच्या हातमाग उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयातर्फे विणकर सेवा केंद्राच्यावतीने शुक्रवारी १२ वा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात आला.

रामचंद्र बुर्ला मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, वस्त्र विभागाचे क्षेत्रीय उपायुक्त गजानन वाडेकर, विनय धोटे, यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, कुरोहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. सिद्धेश्वर बुगडे उपस्थित होते.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, ७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळ सुरू झाली. त्याची आठवण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षांपूर्वी ७ ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन देशाला केले होते. त्याला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सोलापुरातील वस्त्रोद्योगाला पूर्वीचे वैभव पुन्हा आणण्यासाठी औद्योगिक वसाहतीच्या विकासाकरिता ५६ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींना हे शक्य झाले नाही. एकेकाळी मुख्यमंत्रीपददेखील सोलापूरला मिळाले होते. परंतु त्यांच्या काळातही अशा योजनांची अंमलबजावणी झाली नाही. मात्र विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. टॉवेल, चादर, नॅपकिन या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे. विणकर बांधवांनी बाजारातील बदलानुसार आपल्या व्यवसायात बदल करावेत. सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपारिक वस्त्रोद्योग वस्त्र उद्योगात समावेश करण्याची तसेच एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ मध्ये पारंपारिक वस्त्रोद्योग म्हणून सोलापूरच्या सिल्क साडीचा समावेश करावा, या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रशासनाला त्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यातच ही मागणीदेखील पूर्ण होणार आहे. याशिवाय जी आय टॅग असलेल्या उत्पादनांच्या शासकीय खरेदीसाठीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना मागणीचे पत्र देण्यात आले आहे.

एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ – २८ या योजनेअंतर्गत सोलापूर सिल्क साडीला पारंपारिक वस्त्र म्हणून मान्यता मिळाली तर विणकर उद्योजकांना गणेश उत्सव भत्ता सोबतच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच विणकर बांधवांना केंद्र शासनाकडून योजनेतून ओळखपत्र मिळवून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करून ओळखपत्रे देण्यात येतील, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.

याप्रसंगी नगरसेवक व्यंकटेश कोंडी, भाजपाचे मंडल अध्यक्ष नागेश सरगम आदी उपस्थित होते. तानाजी भोईटे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button