राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव ,हातमाग प्रदर्शन व कायमस्वरूपी संग्रहालय उभारणीच्या मागणीचा महानगरपालिका सकारात्मक विचार करणार – महापौर विनायक कोंड्याल

सोलापूर —
७ ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विणकर बाग येथे हातमागावर काम करणाऱ्या विणकराच्या प्रतीकात्मक पुतळ्यास महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त सोलापूरच्या ऐतिहासिक हातमाग परंपरेला सलाम करण्यात आला तसेच हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विणकर बांधवांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश दादा कोठे, नगरसेवक प्रथमेश दादा कोठे, सोलापूर मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, अशोक इंदापुरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, सत्यनारायण गुर्रम, विनोद भोसले, अक्षय अंजीखाने, श्रीनिवास कोंडी, विजय चिप्पा, प्रशांत पल्ली, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, अंबादास बिगी, मंडळ अध्यक्ष नागेश सरगम, नागेश खरात, अजय दासरी, श्रीनिवास क्यातम, वासुदेव इपलपल्ली, मुरलीधर आरकाल, रमेश विडप, मल्लिकार्जुन आरकाल यांच्यासह विणकर समाजाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी हातमाग उद्योगात उल्लेखनीय योगदान देणारे श्री. प्रवीण फलमारी, नागनाथ वंगा, विजय बडगु, व्यंकटेश येमूल, महेश संचू, सत्यनारायण गंगा, श्रीनिवास अनंतुल तसेच श्री. झुंजा यांचा महापौर श्री. विनायक कोंड्याल व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सोलापूर शहर भाजपा च्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानपत्रामध्ये सोलापूरच्या जागतिक कीर्तीच्या हातमाग उद्योगाचा गौरव करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून सोलापूरच्या विणकरांचा व वस्त्रोद्योगाचा उल्लेख करून केलेल्या गौरवाची आठवण करून देण्यात आली आहे. तसेच ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेला बळ देत हातमाग उद्योगाच्या प्रगतीसाठी विणकर बांधवांनी केलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या सन्मानपत्राचे मार्गदर्शक आमदार श्री. देवेंद्र (दादा) कोठे असून, संयोजक नगरसेवक सीए. विनोद धर्मा भोसले व नागेश सुरेश खरात यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. सोलापूरच्या हातमाग परंपरेचे जतन आणि विणकर समाजाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक इंदापुरे यांनी केले. त्यांनी सोलापूरच्या हातमाग उद्योगाचा समृद्ध इतिहास जतन करण्यासाठी विणकर बाग येथे दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सात दिवसांचे हातमाग प्रदर्शन आयोजित करण्यात यावे, तसेच हातमाग उद्योगाचा इतिहास, पारंपरिक विणकामाची साधने, विविध वस्त्रप्रकार आणि विणकर समाजाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय (म्युझियम) उभारण्यात यावे, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना महापौर श्री. विनायक कोंड्याल म्हणाले की, “सोलापूरची ओळख ही हातमाग उद्योग आणि विणकरांच्या कष्टाळू परंपरेमुळे देशभर निर्माण झाली आहे. हजारो विणकरांच्या अथक परिश्रमातून सोलापुरी चादर, टॉवेल आणि इतर हातमाग वस्त्रांनी देश-विदेशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा अमूल्य वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले, “विणकर समाजाने मांडलेल्या सात दिवसांच्या हातमाग प्रदर्शनाच्या तसेच कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय उभारण्याच्या मागण्या अत्यंत रास्त असून, महानगरपालिका प्रशासनामार्फत त्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
हातमाग उद्योगाला चालना देणे, विणकरांच्या कलेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सोलापूरचा सांस्कृतिक व औद्योगिक वारसा जतन करणे, यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे.”
महापौरांनी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने सर्व विणकर बांधवांना शुभेच्छा देत पारंपरिक हातमाग उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान, नव्या बाजारपेठा आणि युवकांचा सहभाग मिळवून देण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच ‘लोकल ते ग्लोबल’ या संकल्पनेनुसार सोलापूरच्या हातमाग उत्पादनांचा देश-विदेशात अधिक व्यापक प्रचार व प्रसार व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप विणकर समाजाच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान व्यक्त करत आणि हातमाग उद्योगाच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.



