आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : हातमाग दिनी आमदार देवेंद्र कोठे यांनी विणकर बांधवांना दिली गोड बातमी
सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सूचना...

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रशासनाला दिल्या. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी पाठपुरावा केला होता.
सोलापूर शहर हे ऐतिहासिक काळापासून वस्त्रोद्योगासाठी देशात प्रसिद्ध शहर आहे. सोलापुरात हातमाग कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून येथील हातमागधारकांकडून जगप्रसिद्ध सोलापूर सिल्क साडी अत्यंत परिश्रमाने तयार केली जाते. हातमाग विणकारांना साडी निर्मिती करताना जटिल, सूक्ष्म, कलाकृतीचे, अंगावर ताण येणारे आणि उच्च कौशल्याचे काम करावे लागते.
एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ – २८ मध्ये पारंपारिक वस्त्रोद्योग म्हणून पैठणी साडी, हिमरू, करवतकाठी, विदर्भ घोंगडी, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील खण फॅब्रिक या वस्त्रोद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु सोलापुरी सिल्क साडी या उत्कृष्ट पारंपारिक वारशाला शासनाच्या अधिकृत पारंपारिक वस्त्रोद्योग यादीत हक्काचे स्थान मिळालेले नाही. त्यामुळे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणात सोलापूर सिल्क साडीचा पारंपारिक वस्त्रोद्योग म्हणून समावेश करून हातमाग कामगारांना सवलती व आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे ३० जुलै रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेत सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
——–
चौकट
हातमाग दिनी आमदार देवेंद्र कोठे यांची विणकर बांधवांना गोड बातमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाची गोड बातमी शुक्रवारी हातमाग दिनी आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापुरातील विणकर बांधवांना दिली. त्यामुळे विणकर बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
——-
कोट
विकसित महाराष्ट्रात सोलापूरचे मिळणार अधिक योगदान
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला दिलेल्या विकसित भारत २०४७ या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र २०४७ हे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापूरच्या हातमाग साडीला पारंपरिक वस्त्रोद्योगात समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे विकसित महाराष्ट्रात सोलापूरचे योगदान अधिक ठळकपणे देणे शक्य होणार आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य



