लाच प्रकरणातील मोटार वाहन निरीक्षकांविरुद्ध दोषारोप दाखल न करण्याचे मा. उच्च न्यायालयाचे आदेश… ॲड. निलेश जोशी

यात हकीकत
यातील तक्रारदाराने महाराष्ट्र बॉर्डर नांदणी चेकपोस्ट येथील मोटर वाहन निरीक्षक हे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून लाच स्वीकारतात अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे केली होती. त्यानुसार त्यांना औरंगाबाद युनिट यांच्याकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथील कार्यालयात पाठवून देण्यात आले. तक्रारदाराची तक्रार नोंदवून घेण्यात आली. सदर तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता, खाजगी इसम अमोल पाटील यांनी तक्रारदाराकडे चेकपोस्ट पास करण्यासाठी म्हणून रक्कम रु. ३,०००/- ची मागणी करुन तडजोडीअंती रक्कम रु. २,५००/- स्विकारण्याचे कबुली दिली. त्यावेळी कर्तव्यावर हजर असलेले मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांनी लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवली.
त्यानुसार मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ व खाजगी इसम अमोल पाटील यांच्याविरुद्ध पुढील लाचेसंदर्भातील सापळा रचण्यात आला. सदर लाचेची रक्कम अमोल पाटील यांनी स्वीकारून कार्यालयातील टेबलच्या कप्प्यात ठेवली. त्यामुळे जालना येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ व खाजगी इसम अमोल पाटील यांना रंगेहात पकडण्यात येवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोलापूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपीची जामीनावर सुटका केली होती.
मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांनी ॲड. निलेश जोशी, सोलापूर यांच्यावतीने मा. ना. उच्च न्यायालय, कोल्हापूर येथे त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफ. आय. आर. रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला.
सदर अर्जाची सुनावणी मा. ना. श्री. न्यायमूर्ती संदेश पाटील सोl यांच्यासमोर होऊन ॲड. निलेश जोशी यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन अर्जाचा अंतिम निकाल होईपावतो मोटर वाहन निरीक्षक तानाजी धुमाळ यांच्याविरुद्ध मे. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल न करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांना दिलेले आहेत.
यात मोटर वाहन निरीक्षक, तानाजी धुमाळ यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी, सोलापूर यांनी उच्च न्यायालय, कोल्हापूर येथे काम पाहिले.



