“शेतीपंपासाठी ५ तास व ग्रामीण भागात २४ तास वीज द्या; रयत क्रांती संघटनेचा महावितरणला इशारा”

सोलापूर
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मिळणारा वीजपुरवठा कमी करण्यात आल्याने शेती संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन शेतीपंपासाठी किमान पाच तास व ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज २४ तास सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी शेतीपंपांसाठी आठ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र सध्या तो केवळ दोन तासांवर आणण्याचे आदेश शासनाने दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाळण्याच्या मार्गावर असून जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
संघटनेने शासनाला उद्योगधंद्यांपेक्षा शेतीला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. तसेच ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आणि वाडी-वस्त्यांवर सिंगल फेज वीजपुरवठा एक ते दोन महिन्यांपासून खंडित असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, लहान मुले व वृद्ध नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शेतकरी व ग्रामीण नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवून शेतीपंपासाठी किमान पाच तास वीजपुरवठा तसेच ग्रामीण भागात २४ तास सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी, अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष अमोल वेदपाठक, पश्चिम महाराष्ट्र ओबीसी अध्यक्ष हनुमंत गिरी, तालुका सचिव महादेव हक्के, जिल्हा सचिव रमेश भंगे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा ननवरे व सदस्य रेवप्पा सुतार आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.



