गोकुळ साखर कारखान्याकडून थकीत ऊस बिल तात्काळ द्यावे; शेतकऱ्यांची साखर उपआयुक्त विजय गावडे यांच्याकडे मागणी…

सोलापूर
धोत्री येथील शेतकऱ्यांनी सोमवारी साखर उपआयुक्त विजय गावडे यांची भेट घेऊन गोकुळ साखर कारखान्याकडील थकीत ऊस बिल तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी केली. रयत क्रांती संघटनेच्या वतीने याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. नामदेव पवार, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काशिनाथ बिराजदार तसेच जिल्हा सरचिटणीस रमेश अण्णा भंगे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गोकुळ साखर कारखाना, धोत्री येथील शेतकऱ्यांचे सन २०२४-२०२५ व २०२५-२०२६ या गळीत हंगामातील ऊस बिल अद्याप प्रलंबित आहे. धोत्री परिसरातील काही शेतकऱ्यांची एकूण १ लाख २९ हजार रुपयांची रोख रक्कम कारखान्याकडून देणे बाकी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कारखान्याकडून नियमानुसार वेळेत बिल न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न तसेच शेतीसाठी लागणारा खर्च भागविणे कठीण झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल तातडीने त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
तसेच कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे शेतजमिनींचे नुकसान होत असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.



