भाजपा कार्यकर्त्यांच्या सन्मानाला सर्वोच्च प्राधान्य
पालकमंत्री जयकुमार गोरे : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानात विविध विषयांवर मंथन

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या तीन पिढ्यांमधील देवदुर्लभ कार्यकर्त्यांमुळे भाजपाला सुवर्णकाळ पाहता येत आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या सन्मानाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असेल असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत दोन दिवसांच्या कार्यकर्ता प्रशिक्षण निवासी शिबिराचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शनिवारी दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. चिंचोली औद्योगिक वसाहतीमधील प्रभाकर रिसॉर्ट येथे हे शिबिर सुरू आहे.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर भाजपाचे सोलापूर प्रभारी आमदार योगेश टिळेकर, आमदार देवेंद्र कोठे, माजी खासदार अमर साबळे, योगेश बाचल, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, संघटनेपेक्षा दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. पक्षाला चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मान आणि न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत. कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्ष वाया जाऊ देणार नाही, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितले.
भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या, भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून पक्षात कार्यकर्त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा १९८० ते २०२६ हा प्रवास प्रेरणादायी असल्याचेही शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी याप्रसंगी सांगितले.

या निवासी प्रशिक्षण शिबिरात दिवसभर माजी खासदार अमर साबळे यांनी देशापुढील राजकीय व सामाजिक आव्हाने, आमदार योगेश टिळेकर यांनी कार्यविस्तार, प्रा. मोहिनी पत्की यांनी कार्यकर्ता विकास व अपेक्षा, योगेश बाचल यांनी मन की बात व कार्यपद्धती तर ऍड. अनिकेत निकम यांनी सोशल मीडिया या विषयावर मार्गदर्शन केले. सरचिटणीस सुधा अल्लीमोरे, आणि डॉ. शिवराज सरतापे यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी भाजपाचे शहर पदाधिकारी मोर्चा अध्यक्ष सरचिटणीस, प्रकोष्ठ संयोजक मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
रविवारी दिवसभर विविध सत्र होणार असून रविवारी सायंकाळी या निवासी शिबिराचा समारोप होणार आहे.



