सोलापुरात डीजे दणका महागला; लाखोंचे साहित्य जप्त…

सोलापूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांदरम्यान ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी वाढल्याने फौजदार चावडी पोलिसांनी मोठी कारवाई करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर धडक मोहीम राबवली. या कारवाईत तब्बल ₹२० लाख ५० हजार किमतीचे डीजे साहित्य व एक वाहन जप्त करण्यात आले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यावेळी अनेक मंडळांकडून परवानगीतील अटींचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात डीजे साऊंड सिस्टमचा वापर केला जात होता. तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनीप्रदूषण सुरू ठेवण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या.
यापूर्वीच पोलिस प्रशासनाने डीजे वापराबाबत स्पष्ट आदेश देऊन आवाजाची मर्यादा व वेळेचे बंधन पाळण्याचे निर्देश दिले होते. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र काही मंडळांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला.
फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी छापे टाकत डीजे साहित्य जप्त केले. यात साऊंड सिस्टिम, अॅम्प्लिफायर, मिक्सर, पावर डोली, स्पीकर बॉक्स आदी महागडे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच MH14 MH 9684 क्रमांकाचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत अंदाजे ₹२०,५०,००० इतकी असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक, कर्मचारी व विशेष पथकाने संयुक्तरित्या ही मोहीम राबवली. संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून, ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन, सार्वजनिक शांततेला बाधा व आदेशाचे उल्लंघन या कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात कायद्याचे व नियमांचे पालन करावे. ध्वनीप्रदूषण टाळून शांतता राखावी, अन्यथा अशा प्रकारची कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. श्री. एम. राजकुनार, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ), श्री. विजय कबाडे, मा. राहा. पोलीस आयुक्त विभाग- श्री. प्रताप पोमण, य.पो.नि. श्री. महादेव राउत, पोलीस निरीक्षक श्री.तानाजी दराडे यांचे मागदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पथक प्रमुख सपोनि श्री. संजय क्षिरसागर, पोहवा बसवेश्वर परिट. पांडया/जगदीश हुरुले, पोना/शिवानंद भिनवे, पोकों/विनोद पुजारी, पोकों/कृष्णा बहुरे. पोकों/विनायक जाधव, पोली/रची बैंडे, पोकी/दिनोद व्हटकर, पोकों/अजय चव्हाण, पोथी/आठीश पाटील, पोकोर्टानेश्वर गायकवाड, पोकों/अमोल खरटमल, पोकों/सुरज सोनवलकर, पोकों/ सुधाकर माने, पोकों/नितीन गोरे, पोळी पंकज घाडगे, वांनी केलेली आहे



