maharashtrapoliticalsocialsolapur

विवाह म्हणजे समाजाशी नातं” – शुभम-धनश्री यांचा संदेश

मोरवंचीत बालकाश्रम- वृद्धाश्रमात पार पडला प्रेरणादायी विवाह सोहळा

महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभम मिसाळ आणि धनश्री सुर्वे या नवदाम्पत्याने समाजापुढे एक वेगळा आणि प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. मोरवंची येथील प्रार्थना फौंडेशन संचलित बालकाश्रम आणि वृद्धाश्रमात त्यांनी आपला कौटुंबिक विवाह सोहळा पार पाडत, विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर समाजाशी नातं जोडणारा संस्कार असल्याचा संदेश दिला.

 

 

 

 

विशेष म्हणजे शुभम मिसाळ आणि धनश्री सुर्वे हे दोघेही सामाजिक कार्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. त्यामुळे समाजाविषयी असलेली संवेदनशीलता, वंचित घटकांविषयी असलेली आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी त्यांच्या या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आली.

 

 

 

 

आजच्या काळात विवाहसोहळ्यांमध्ये लाखो रुपयांचा खर्च, मोठ्या प्रमाणावर सजावट, डीजे, जेवणावळी आणि दिखावा यांना अधिक महत्त्व दिलं जातं. मात्र शुभम आणि धनश्री यांनी या सगळ्या गोष्टींपेक्षा समाजातील वंचित, निराधार आणि प्रेमाची अपेक्षा असलेल्या लोकांना आनंद देण्याचा मार्ग निवडला. बालकाश्रमातील लहान मुला-मुलींसोबत त्यांनी लग्नाचा आनंद साजरा केला, तर वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत वेळ घालवत त्यांना आपुलकीची भावना दिली.

 

 

 

विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्यात त्यांनी पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला. नवदाम्पत्याने वृक्षारोपण करून “एक झाड म्हणजे एक जीवन” हा संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचवला. विवाहासारख्या आनंदाच्या प्रसंगी पर्यावरणासाठीही काहीतरी करण्याचा विचार त्यांनी कृतीतून दाखवून दिला.

याचबरोबर त्यांनी बालकाश्रमातील एका मुलगा आणि एका मुलीला शैक्षणिक दत्तक घेण्याचा संकल्प केला. लग्नामध्ये भेटरूपाने मिळालेली रक्कम त्यांनी त्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अर्पण केली. शिक्षण हीच खरी संपत्ती आहे, या विचाराला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. अनेकजण लग्नात लाखो रुपये खर्च करतात, मात्र शुभम आणि धनश्री यांनी त्या पैशातून दोन मुलांच्या भविष्यासाठी नवा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

हा विवाह सोहळा उपस्थितांसाठी केवळ आनंदाचा क्षण नव्हता, तर तो समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश ठरला. अशा प्रकारचे उपक्रम युवक-युवतींसमोर नवा आदर्श निर्माण करणारे आहेत. समाजात बदल घडवायचा असेल तर तो स्वतःपासून सुरू करावा लागतो, हे या नवदाम्पत्याने दाखवून दिलं.

 

 

 

 

या कार्यक्रमाला प्रसाद मोहिते, अनु मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रसिद्ध लोकव्याख्यानकार प्रा. विशाल गरड यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी शुभम आणि धनश्री यांच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत, हा आदर्श महाराष्ट्रातील तरुणांनी घ्यावा असे मत व्यक्त केले.

 

 

समाजात आजही अनेक वृद्ध, निराधार आणि अनाथ मुलं प्रेम, आधार आणि आपुलकीच्या शोधात आहेत. अशा वेळी शुभम मिसाळ आणि धनश्री सुर्वे यांनी विवाहासारख्या खास प्रसंगाला सामाजिक बांधिलकीची जोड देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा उपक्रम निश्चितच महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button