विशेष मुलांनी सीमेवरील सैनिकांसाठी पाठवल्या राख्या
स्वगती शाळेत साजरे झाले अनोखे रक्षाबंधन : सैन्यदलातील सैनिक अन अधिकारीही भारावले

सोलापूर : प्रतिनिधी
सैनिकांना भेटण्यासाठी आतुर असलेली विशेष मुले… हातात त्यांनीच बनवलेल्या राख्या अन ओवाळणीचे ताट…सैनिक शाळेत येताच झालेला ‘भारतमाता की जय’ चा जयघोष अशा उत्साहाने व देशभक्तीने भारलेल्या वातावरणात शुक्रवारी सीमेवरील सैनिकांना सोलापुरातील विशेष मुलांनी राख्या पाठवल्या.
रोटरी रेडक्रॉस स्वगती शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे सीएचएम हरजीत सिंग, युवराज देसवले, राहुल धुमाळ, संगमेश्वर महाविद्यालयाच्या असोसिएट एनसीसी ऑफिसर कॅप्टन शिल्पा लब्बा, असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट तुकाराम साळुंखे, शाळेच्या अध्यक्षा गीता बालिगा उपस्थित होते.

याप्रसंगी स्वगती शाळेच्या विशेष मुलांनी सैनिकांना राख्या बांधून, औक्षण करून राख्या सीमेवरील सैनिकांसाठी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यांच्या या उपक्रमाचे अधिकारी आणि सैनिकांनी कौतुक केले. विशेष मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या रोटरी रेडक्रॉस स्वगती स्वगती शाळेतील मुलींनी राखी बांधल्याने भारतीय सैन्य दलातील अधिकारी आणि सैनिक भारावून गेले.
याप्रसंगी सैन्य दलातील अधिकारी आणि सैनिकांनी स्वगती शाळेत विशेष मुलांसाठी चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
संचालिका प्रा. तृप्ती बापट यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री गुमास्ते, सचिवा ऍड. दीपाली मादगुंडी, खजिनदार प्रा. विशाखा मराठे, सहसचिव पुरुषोत्तम कारकल, संचालिका संचालिका प्रा. तृप्ती बापट, प्रा. सुनिती बावचकर तसेच शाळेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.



