india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

आश्वासनानंतर १०२ रुग्णवाहिका चालकांचे कामबंद आंदोलन स्थगित; वारीनंतर प्रलंबित मागण्यांवर निर्णयाची अपेक्षा…

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर, दि. १७ जुलै :

 

जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत कार्यरत १०२ रुग्णवाहिका चालकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवार (दि. १७ जुलै) पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजी. गुलाबचंद पवार यांनी चालकांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा करून सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालक संघटनेने सध्या हे आंदोलन स्थगित (मागे) घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रुग्णवाहिका चालकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रलंबित वेतन तात्काळ अदा करणे, किमान वेतन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, महागाई भत्ता लागू करणे तसेच इतर प्रलंबित आर्थिक व सेवा विषयक मागण्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली आहे. या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत चालकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता.

 

 

यासंदर्भात चालक संघटनेच्या प्रतिनिधींची जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजी. गुलाबचंद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेत चालकांच्या सर्व मागण्या सकारात्मक पद्धतीने सोडविण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील तसेच आषाढी वारीचा सोहळा पूर्ण झाल्यानंतर तातडीने बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपाध्यक्षांनी दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक जिल्ह्यात दाखल होत असून अशा काळात १०२ रुग्णवाहिका सेवा अखंडित सुरू राहणे अत्यंत गरजेचे आहे. जनहित आणि सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन आंदोलन केल्यास रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये, या भूमिकेतून चालकांनी प्रशासनाच्या आश्वासनावर विश्वास व्यक्त करत सध्या कामबंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

 

 

मात्र, वारीनंतरही मागण्यांबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर पुढील आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेतही चालक संघटनेकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कितपत होते, याकडे १०२ रुग्णवाहिका चालकांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे निवेदन १०२ सर्व वाहनचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी दिले असून, त्यास सर्व १०२ रुग्णवाहिका चालकांच्या सह्यांचे पत्रकही जोडण्यात आले आहे. निवेदनाची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button