गोळीबार करून दरोड्याचा प्रयत्न; २४ तासांत गुन्ह्याची उकल, पाच आरोपी जेरबंद…

सोलापूर
दि. १८ जुलै :
सोलापूर तालुका पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गोळीबार करून दरोडा टाकण्याचा आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाच आरोपींना जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक इर्टिगा कार आणि दोन दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली असून, उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीचा चालक एजाज नबीलाल तांबोळी (वय ३७, रा. कर्णिकनगर, सोलापूर) हा दिवसभराची वसुली कंपनीच्या मालकांच्या घरी घेऊन जात होता. सोलापूर-हैदराबाद महामार्गालगत पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा कारमधून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्याचा पाठलाग केला. त्यापैकी एका आरोपीने रिव्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडत एजाज तांबोळी यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. गोळीचा छरा त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूस लागल्याने ते जखमी झाले.या प्रकरणी एजाज तांबोळी यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध दरोडा व जीवे मारण्याचा प्रयत्न यांसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी तीन विशेष तपास पथके तयार केली. तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी बोरामणी परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आणखी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात एकूण आठ आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. त्यापैकी चार आरोपींना १६ जुलै रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. ॲपेक्स स्टील अँड हार्डवेअर कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच कंपनीची रोकड, वेळ आणि हालचालींची गोपनीय माहिती आरोपींना पुरवल्याचे उघड झाले. या कर्मचाऱ्याला १७ जुलै रोजी बोरामणी येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. त्यालाही अटक करून न्यायालयात हजर केले असता २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक इर्टिगा कार आणि दोन दुचाकी मोटारसायकली जप्त केल्या आहेत. उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
अवघ्या २४ तासांत गंभीर गुन्ह्याचा छडा लावत पाच आरोपींना अटक करण्यात सोलापूर तालुका पोलिसांना मिळालेले हे यश जिल्ह्यात विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, मा.श्री.विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक,सुरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका, पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सहाय्यक पोलीस फौजदार विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, शशिकांत कोळेकर, महेश कटकधोंड धनराज गायकवाड, पोलीस नाईक अनंत चमके, पोलीस अंमलदार पैंगबर नदाफ, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे व सायबर पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार निखिल पवार यांनी केली आहे.



