maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूरसाठी भरीव योगदान देण्याची हीच योग्य वेळ

आमदार देवेंद्र कोठे यांचे प्रतिपादन : ९५ माय एफएम आणि दैनिक भास्कर ग्रुपच्या 'पॉवर कॉन्फ्लुएन्स २०२६' मध्ये मांडले आग्रही मत

 

 

सोलापूर : प्रतिनिधी

विकासासाठी सर्वतोपरी बळ देण्यासाठी राज्याचे नेतृत्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीर आहेत. आपण सर्वांनी सोलापूरच्या विकासासाठी प्रत्येकाने भरीव योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे. आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रातून सोलापूरच्या विकासाचे कृतिशील स्वप्न पहा. शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियम येथे झालेल्या ९५ माय एफएम आणि दैनिक भास्कर ग्रुपच्या ‘पॉवर कॉन्फ्लुएन्स २०२६’ मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या विकासाबाबत आग्रही मते मांडली. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती.

अमृत ढगे यांनी मुलाखत घेतली.

‘पॉवर कॉन्फ्लुएन्स २०२६’ मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरला उभारण्यात येणारे आयटी पार्क, विमानसेवा, उद्योग, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविधांगी विषयांवर अभ्यासू मते प्रकट केली.

सोलापूरच्या विमानसेवा स्थानिक खासदारांकडूनच शंका उपस्थित करण्यात येत होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर भूमिकेमुळे सोलापूरची विमानसेवा सुरू झाली आणि टिकली देखील. गोवा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ २१ आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी जोडले गेले आहे. त्यामुळे सोलापूर देखील जोडले गेले. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांचा मोठा विकास झाला आहे. त्यांच्याप्रमाणेच सोलापूर शहरालाही पर्यटन, उद्योग क्षेत्रासाठी चांगली संधी आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरले. दक्षिण आणि उत्तर भारताला जोडण्यासाठी सोलापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. रस्ता, रेल्वे आणि आता हवाई मार्गानेही सोलापूरची वाहतूक सुरू झाली आहे. येथे उद्योगाला असलेली संधी पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामांच्या पहिल्या पाच प्राधान्यक्रमात सोलापूरच्या आयटी इंडस्ट्रीचा समावेश केला आहे. सोलापूरच्या विकासाचा रखडलेला अनुशेष भरून काढण्यासाठी या आयटी पार्कला ए आय पार्कची जोड देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे आमदार देवेंद्र कोठे म्हणाले.

 

 

 

 

गेल्या ३५ वर्षांपासून अक्कलकोट रस्ता एमआयडीसी मध्ये रस्ते होऊ शकले नाहीत. एकीकडे सोलापूर शहरात आयटी पार्क येत असताना अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या पाठीशीही आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे या हेतूने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून एमआयडीसीतील रस्त्यांच्या निधीसाठी आग्रह केला. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच शहरातील एमआयडीसीतील रस्त्यांसाठी खास बाब म्हणून ५६ कोटी रुपयांचा निधी दिला. विशेष म्हणजे या रस्त्यांसाठी नियमानुसार सोलापुरातील उद्योजकांना भरावे लागणारे तब्बल १४ कोटी रुपयेही राज्य सरकारने माफ केले. दाओसमध्ये करार होत असताना गुंतवणुकीसाठी देशात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला मिळाली आहे.

 

 

 

 

उद्योजकांना सोयी सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. उद्योजक आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वीकारली आहे. बिल्डर, डेव्हलपर, आयटी शिक्षण अशा कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या सोलापूरकरांनी सोलापूरच्या विकासासाठी योगदान द्यावे. याकामी तुमच्या पाठीशी शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी कायम राहू. काहीजण चांगल्या कामांवर टीका करतात. त्यांना चांगले पहायचेच नसते. मी प्रामाणिकपणे शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. परिश्रम, सातत्य, त्याग आणि समर्पण असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. सर्व सोलापूरकरांनी एकत्र येऊन शहराच्या विकासात योगदान दिले तर शहर वेगाने विकसित सोलापूर म्हणून ओळखले जाईल असेही आमदार देवेंद्र कोठे यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button