सोलापुरात पाणीपुरवठ्याचा मेगा प्लॅन; BOT मॉडेलवर उभारणार १४०० कोटींचा प्रकल्प
सोलापुराच्या पाणी समस्येला मोठा दिलासा; महापालिकेची ऐतिहासिक बैठक

दि. ११ एप्रिल २०२६
सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र नागरी जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर कार्यक्रम (MUWREP) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सोलापूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आढावा आज महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, MITRA चे मा.श्रीं प्रवीण परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.या बैठकीस महापालिका उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर,उपायुक्त आशिष लोकरे संशोधन अधिकारी, MITRA श्रुतीका पाटडे, वरिष्ठ जलतज्ज्ञ, जागतिक बँकचे
श्री. श्रीनिवास पोडिपिरेड्डी, व्यकटेश चौबे यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत सुमारे ₹१३७८.४२ कोटी (सुमारे १४०० कोटी) खर्चाच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार २०३० ते २०६० या कालावधीतील पाणी मागणी, उपलब्धता आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी यावर चर्चा करण्यात आली.सध्या सोलापूर शहराला उजनी धरणासह विविध स्त्रोतांद्वारे पाणीपुरवठा केला जात असून एकूण सुमारे २७७.५० MLD पाणी उपलब्ध आहे. मात्र, जलशुद्धीकरण क्षमता पुरेशी असतानाही वितरण व्यवस्था जुनी व अपुरी असल्याने संपूर्ण शहराला प्रभावी पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे निदर्शनास आले.

शहरासाठी सुमारे १८६० किमी वितरण जाळ्याची आवश्यकता असून सध्या केवळ ८५० किमी व्यवस्था कार्यरत आहे.प्रस्तावित योजनेअंतर्गत नवीन जलशुद्धीकरण केंद्रे, मुख्य जलकुंभ, सुमारे १११७ किमी नवीन वितरण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प, यांत्रिक व विद्युत कामे, तसेच रस्ते दुरुस्ती यांसह विविध कामांचा समावेश आहे. या योजनेमुळे शहरात २४x७ अखंडित व शाश्वत पाणीपुरवठा करण्याचा उद्देश आहे.
याशिवाय, प्रकल्पाच्या आर्थिक रचनेत महानगरपालिकेचा २५% हिस्सा, केंद्र शासनाचा २५% निधी व जागतिक बँकेचे ५०% सहाय्य प्रस्तावित आहे. तसेच, पाणीपट्टी व मालमत्ता कर प्रणालीत सुधारणा करून महसूल वाढविण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, MITRA प्रवीण परदेशी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.

यावेळी बैठीकत प्रकल्पाच्या आर्थिक बाबींविषयी ,“सुमारे १४०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आर्थिक बळकटी विविध माध्यमांतून उभी करण्यात येणार आहे. BOT (Build, Operate, Transfer) पद्धतीचा अवलंब करून खासगी गुंतवणूक आकर्षित केली जाईल. तसेच महानगरपालिकेच्या वतीने बॉण्डच्या स्वरूपात निधी उभारण्याचाही विचार करण्यात येत आहे, ज्यामुळे दीर्घकालीन आर्थिक स्त्रोत निर्माण होतील. या योजनेचे प्रत्यक्ष काम येत्या दोन ते तीन महिन्यांत सुरू करण्याचे नियोजन असून, आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जातील. कोणताही नवीन कर लागू न करता सध्या असलेली सुमारे ७५ टक्के कर वसुली वाढवून ती ९५ टक्क्यांपर्यंत नेण्यावर भर दिला जाणार आहे, ज्यामुळे महसुलात लक्षणीय वाढ होऊन प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक सक्षमपणे करता येईल.”अशी चर्चा करण्यात आले.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी
“सोलापूर शहराच्या दीर्घकालीन पाणी प्रश्नावर हा प्रकल्प कायमस्वरूपी उपाय ठरेल. नागरिकांना स्वच्छ, पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करतील.”बैठकीस महानगरपालिकेचे अधिकारी व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते…



