माजी महापौर मनोहर सपाटे यांचे राष्ट्रवादी (शरद पवार गट) शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या विरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण….

सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) सोलापूर शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या कार्यपद्धतीविरोधात माजी महापौर मनोहर सपाटे यांनी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. हे उपोषण पार्क चौक येथील शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शांततेत पार पडले.
पक्ष संघटन, उमेदवारी वाटप व आघाडी धोरणाबाबत अध्यक्षांनी मनमानी निर्णय घेतल्याचा आरोप करत मनोहर सपाटे यांनी या उपोषणाच्या माध्यमातून तीव्र निषेध नोंदवला. शहरात आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या हिताला मारक ठरणारे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मनोहर सपाटे यांच्या प्रमुख मागण्या व आरोप :
निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेल्या अनुभवी व ज्येष्ठ उमेदवारांना उमेदवारी देण्यात शहराध्यक्ष अपयशी ठरले आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती/आघाडी केल्यास पक्षाचा मोठा फायदा होऊन अधिक नगरसेवक निवडून येऊ शकतात, मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
शरद पवार साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होईल असे धोरण निवड समितीत राबवले जात असून याचा तीव्र निषेध आहे.

ज्या १७ जागांवर उमेदवारी देण्यात आली आहे, त्यापैकी किती उमेदवार निवडून येण्याची प्रत्यक्ष क्षमता आहे, हे अध्यक्षांनी जाहीर करावे.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती न घेता मनमानी पद्धतीने तिकीट वाटप केले जात असल्याचा आरोप.
शहराध्यक्षांच्या पक्षविरोधी कृतीमुळे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत.
पक्षश्रेष्ठींना खरी परिस्थिती न सांगता अंधारात ठेवून अयोग्य आघाड्या केल्या जात आहेत.
तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये सक्षम उमेदवारी निर्माण करणे आवश्यक असताना आर्थिक हितसंबंध जपून पक्षाचे नुकसान केले जात आहे.
चार प्रभाग असताना चारी जागा आघाडीतील एकाच पक्षाला देण्यामागे आर्थिक हितसंबंध आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

निवडणुकीची तयारी न करता अध्यक्षपद व्यवसाय म्हणून हाताळले जात असल्याचा गंभीर आरोप.
मा. शरद पवार साहेबांच्या विचारधारेकडे दुर्लक्ष करून पक्षाला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे नमूद केले.
मनोहर सपाटे यांनी यावेळी स्पष्ट केले की, पक्ष व शरद पवार साहेबांचे विचार वाचवण्यासाठी हा संघर्ष असून, पक्षश्रेष्ठींनी तातडीने याची दखल घ्यावी. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.



