ॲट्रॉसिटी प्रकरणात मुंबईच्या पोलिसांसह दोघे निर्दोष:- ॲड. धनंजय माने…

बांधाच्या हद्दीवरुन झालेल्या वादात फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली व हद्दीच्या खुणासाठी लावलेले सिमेंटचे पोल तोडून चारी बुजवून फिर्यादीचे नुकसान केल्याच्या आरोपावरुन मुंबईचा पोलीस रवि जगन्नाथ पवार व त्याचे वडील जगन्नाथ रतन पवार दोघे रा. कामती (खुर्द), ता. मोहोळ यांचेविरुध्द भरण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी खटल्याची सुनावणी ॲडी. सेशन्स जज्ज श्री. मोहिते यांच्यासमोर होऊन न्यायाधिशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की, आरोपीच्या शेताच्या शेजारील शेत फिर्यादीने विकत घेतले होते. शेताच्या क्षेत्रफळाचा वाद झाल्याने शासकीय मोजणी झाली होती. मोजणीदाराने खाणाखुणा दर्शवल्याने फिर्यादीने शेताच्या कडेने सिमेंटचे पोल रोवले होते. त्याबद्दल दोन्ही गटात वाद झाला होता. दिवाणी कोर्टात व महसुल न्यायालयात एकमेकांविरुध्द खटले दाखल करण्यात आली. आरोपीने सदरचे हद्दी दाखवणारे पोल उखडून काढले आणि जातीवाचक शिवीगाळ केली अशी फिर्याद फिर्यादीने कामती पोलीस स्टेशनला दिली होती. सदर प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर डी.वाय.एस.पी. यांनी आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदरचा वाद दिवाणी स्वरुपाचा आहे. केवळ आरोपींवर दबाव आणण्यासाठी सदर दिवाणी वादास ॲट्रॉसिटीचे स्वरुप दिलेले आहे. फिर्यादी पक्षाच्या विसंगपुर्वक पुराव्यावर विश्वास ठेवणे धोक्याचे आहे असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. श्रीहरी कुरापाटी, ॲड. प्रणित जाधव यांनी काम पाहिले.