मनपावर भगवा फडकवण्यासाठी युवा सेनेने द्यावे योगदान:- गृहराज्यमंत्री योगेश कदम
युवा सेनेचा मेळावा उत्साहात....

सोलापूर : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आगामी चार महिन्यात सोलापूर महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी युवा सेनेने योगदान द्यावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी युवा सेनेचा मेळावा शिवस्मारक सभागृहात झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनोज शेजवाल, ऋतुराज सावंत, तुकाराम मस्के, संयोजक आणि युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य सुजित खुर्द, ब्रह्मदेव प्रभाकर गायकवाड सागर सोलापूरे, भाविक डोके, विवेक भोसले, अभिषेक कलकेरी, रोहन चौगुले, रणजीत भंडारे, अनिकेत सुळ,उपस्थित होते.
प्रारंभी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते झाले. गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, युवा सेनेने प्राधान्याने समाजकारण करावे. सोलापुरातील विविध महाविद्यालयांमध्ये युवा सेनेच्या शाखांचा प्रारंभ करावा. विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवावेत. विद्यार्थी आणि तरुण वर्गाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीतून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत. आगामी चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका जिंकण्याचे ध्येय प्रत्येक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी ठेवणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या तसेच युवा सेनेच्या सक्षमीकरणासाठी युवकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा. युवा सैनिकांनी १८ ते ३५ वयोगटातील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. तसेच त्यांच्याशी संवाद साधावा, असेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत म्हणाले, आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समिती निवडणूकसाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे. पूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तब्बल पाच आमदार होते. शिवसेनेचा तो सुवर्णकाळ पुन्हा एकदा आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची आवश्यकता आहे. जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शिवसैनिक आणि पदाधिकारी पक्ष वाढीसाठी अहोरात्र काम करत आहेत. सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना नेत्यांनी बळ द्यावे. आगामी काळातील पाच नगरपालिका आणि एक महानगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करतील. सोलापूर महानगरपालिकेत एकेकाळी शिवसेनेचे २१ नगरसेवक होते. वरिष्ठांचे पाठबळ मिळाले तर सोलापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
युवा सेना मेळाव्याचे संयोजक आणि युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य सुजित खुर्द यांनी प्रास्ताविक तर मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी युवा सैनिकांनी जय भवानी जय शिवराय, भारतमाता की जय, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे भाषण ऐकण्यासाठी युवासैनिकांनी मोठी गर्दी केली होती.