‘खंडोबाची नवरात्री’ आणि ‘देवदिवाळी’ नंतर सहा दिवसांच्या षड्रात्री उत्सवाचा समारोप …

मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी ही चंपाषष्ठी अथवा मार्तंडभैरव षष्ठी म्हणून सर्वत्र साजरी होते. मार्गशीर्ष महिन्याला सोमवार (दि. २)पासून प्रारंभ झाला. याच दिवसापासून मार्तंडभैरव षड्यात्रोत्सवासही प्रारंभ झाला. या मासाचा पहिला दिवस ‘खंडोबाची नवरात्री’ आणि ‘देवदिवाळी’ म्हणून साजरा झाल्यानंतर सहा दिवसांच्या षड्रात्री उत्सवाचा समारोप शनिवारी (दि. ७) चंपाषष्ठीला खंडोबा पूजनाने झाली आहे. ज्या परिवारांमध्ये खंडोबा कुलदैवत आहे तिथे चंपाषष्ठीनिमित्त कुलाचार-कुलधर्म करण्याची परंपरा असते. तत्पूर्वी पाच दिवस अनेक घरांमधील सदस्य उपवास करतात. सहाव्या दिवशी खंडोबाची षोडशोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवला जातो. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप लावला जातो.
खंडोबा मंदिरात तसेच शहर व परिसरातील खंडोबा मंदिरांत उत्सव साजरा होतो. चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. मल्हारी मार्तंड हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. घरोघरी मार्तंड भैरवाची म्हणजे मल्हारी मार्तंड देवतेची विधिवत पूजा करून भंडारा उधळत तळी उचलण्याचा विधी केला जातो.
चंपाषष्ठीचे महत्त्व
भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणि या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतल्याचे पुराणात सांगितले जाते. हे युद्ध अवघ्या सहा दिवसांतच संपले. याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो.
चंपाषष्ठी पूजा विधी
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो. या सहा दिवसांत मार्तंडदेवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात. तसेच विधिवत खंडोबाची पूजा करून आरती म्हटली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी धान्यांचे पीठ (ठोंबारा) गव्हाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. काही परिवारात प्रथेनुसार पुरणपोळी किंवा श्रीखंडाचाही नैवद्य दाखवला जातो. तसेच दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे.
यात्रेच्या पुढील प्रत्येक रविवारी सायं श्री ची पालखी,घोडा, नंदीध्वज याचा सह मिरवणूक निघते.
यात्रा काळात मंदिर समिती कढून गाभारा व सभा मंडपामध्ये आकर्षक अशी फुलाची सजावट करण्यात आली आहे.भाविकांना अन्नदान प्रसाद,दर्शनासाठी मुख दर्शन व गाभारा दर्शन रांग , कमांडो फोर्स, सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरा, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
सोलापूर महानगपालिके काढून मंदिर परिसर मध्ये आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी, साफ सफाई, पालखी मार्ग व परिसरात अतिरिक्त पथ दिवे, बसेस,फिरते सौचालय ची व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त यांच्या कडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.