भाजपा शहर मध्य मतदारसंघ शहरात प्रथम तर पुणे विभागात चौथे…
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आमदार देवेंद्र कोठे यांचे विशेष अभिनंदन : भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन पर्व कार्यशाळा उत्साहात....

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या मुदतीपूर्वीच भाजपा सदस्य नोंदणीची उद्दिष्टपूर्ती करणाऱ्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी विशेष अभिनंदन केले. भाजपा सदस्य नोंदणी अभियानात सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा सोलापूर शहरात प्रथम तर पुणे विभागात चौथा क्रमांक आला आहे.
भाजपाची पश्चिम महाराष्ट्र संघटन पर्व कार्यशाळा रविवारी पुणे येथे झाली. या कार्यशाळेप्रसंगी पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने आणि सर्वाधिक चांगली सदस्यता करणाऱ्या पहिल्या पाच विधानसभांचा सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाने भाजपा सदस्यता नोंदणी अभियानात पश्चिम महाराष्ट्रात पहिल्या पाच विधानसभा मतदारसंघात येण्याचा मान पटकावला. या अभियानात सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोलापूर शहरात प्रथम तर पुणे विभागात चौथा आला. त्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशेष अभिनंदन करत सत्कार केला.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे, महामंत्री आमदार विक्रांत दादा पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी,भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमची विधानसभा निवडणूक झाली आहे. आता आगामी निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. प्रत्येक बूथ स्तरावर ५० प्राथमिक सदस्य नोंदणी करून ३ सक्रीय सदस्यता अर्ज भरून घेणे बंधनकारक आहे.ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी उद्दिष्ट पूर्ण केले आहेत त्यांनीच आगामी निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून तिकीट मागणीसाठी यावे. अन्य इच्छुकांचा विचार केला जाणार नाही, असेही प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले…