अभियांत्रिकी महाविद्यालय, टेक्स्टाईल पार्क, गोरक्षण अन् गणेशमूर्तीकरांच्या समस्यांकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी वेधले अधिवेशनात लक्ष….
शहर विकासाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष : सोलापूरकरांनी सोशल मीडियावर केला कौतुकाचा वर्षाव....

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरात प्रस्तावित असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, टेक्स्टाईल पार्क, गोरक्षकांवर दाखल करण्यात येत असलेले खोटे गुन्हे, गणेश मूर्तीकारांच्या समस्या आदी विषयांवर आमदार देवेंद्र कोठे यांची तोफ अधिवेशनात धडाडली. मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी रात्री उशिरा ११ वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या शहर विकासाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, १९६० सालापासून प्रलंबित असलेल्या सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघर्षाला ६५ वर्षांचा इतिहास आहे. सोलापुरात अनुकूल परिस्थिती असूनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराडला हलवण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०१६ साली सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी ३०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सध्या सुरू असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनाची ३४ एकर जागा आहे. तसेच पुरेसा तज्ञ प्राध्यापक वर्गही या ठिकाणी आहे. त्यामुळे शासनाने तत्परतेने निर्णय घेतला तर येत्या जून महिन्यापासून येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होऊ शकते. एक लाखाहून अधिक यंत्रमागधारक व कामगार असलेल्या आणि वस्त्रोद्योगासाठी अनुकूल वातावरण असलेल्या सोलापुरात टेक्स्टाईल पार्क होणे गरजेचे आहे. चादर, टॉवेल, युनिफॉर्म गारमेंट याचा एकत्रित समावेश करून टेक्स्टाईल पार्क तयार केल्यास येथे उद्योगांना मोठा भाव मिळेल. केंद्राकडून जाहीर झालेल्या ३० टेक्स्टाईल पार्कपैकी तसेच राज्य शासनाच्या टेक्स्टाईल प्रकल्पातही सोलापूरला स्थान मिळालेले नाही. सोलापुरातील वस्त्रोद्योगाला असलेले अनुकूल वातावरण आणि तेथील कामगारांचे कौशल्य लक्षात घेऊन सोलापुरात टेक्स्टाईल पार्क सुरू करावे, अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली.
सोलापूर शहरात गणेशमूर्ती तयार करणारे १८ हजार मूर्तिकार आहेत. पीओपीवरील बंदीमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे पीओपी प्रकरणावर अंतिम निकाल लागेपर्यंत या मूर्तिकारांवर कोणतीही कारवाई करू नये याबाबत शासनाला सूचना द्यावी, अशी मागणी याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली. सोलापूर शहर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या सीमेवर असल्याने या जिल्ह्यात गोहत्येचे तसेच गोतस्करीचे प्रमाण मोठे आहे. गोरक्षक गोरक्षणासाठी गेल्यानंतर त्यांच्यावर हल्ले होणे, खोटे गुन्हे दाखल होणे असे प्रकार होतात. त्यामुळे शासनाने गोरक्षणासाठी चांगले कायदे करावेत. त्याचबरोबर हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, अशी मागणीदेखील आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली. याशिवाय प्रलंबित शासकीय योजना पूर्ण कराव्यात, सोलापूर शहरासाठी अमृत २ योजना, १०० इलेक्ट्रिक बस आदी योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार कोठे यांनी केली.
—————————-
चौकट
रात्री ११ वाजेपर्यंत सभागृहात थांबून मांडल्या सोलापूरकरांच्या व्यथा
आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशन काळात दिवसभर सभागृहात कामकाजास उपस्थित राहून रात्री तब्बल ११ वाजेपर्यंत थांबून चर्चेची संधी मिळताच सोलापूरकरांच्या व्यथा मांडल्या. आमदार देवेंद्र कोठे यांच्या या कार्यतत्परतेबद्दल, विकासाची तळमळ आणि प्रामाणिक प्रयत्नांबद्दल सोलापूरकरांनी गुरुवारी दिवसभर फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांवर आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला.