गाड्या खरेदी – विक्रीचा व्यवसाय दाखवून ग्राहकांना चोरीचे मोटारसायकली विकणाऱ्या आरोपी कृष्णात आणि शुभमला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
चोरीच्या एकूण १२ मोटारसायकली हस्तगत...

सोलापूर
दि. 17 जुलै 2025: सोलापूर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत चोरीच्या एकूण 15 मोटारसायकली जप्त केल्या असून, 7 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक 15 जुलै 2025 रोजी, गुन्हे शाखेचे सपोनि शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शेळगी रोड, सोलापूर येथे संशयित इसम कृष्णात ऊर्फ अण्णा महादेव डोंगरे (वय 25, रा. मंगळूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याला चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने सोलापूर, लातूर, पुणे, इंदापूर, भिगवण, रत्नागिरी आणि बिदर (कर्नाटक) येथून 12 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत या 12 मोटारसायकली जप्त केल्या.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
दिनांक 9 जुलै 2025 रोजी, सपोनि शंकर धायगुडे आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे, शुभम भागवत सावंत (वय 28, रा. चिंचोली, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याला सोलापूर शहरातील जुना पुणे नाका येथील ब्रिजजवळ चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याने सोलापूर शहरातून 3 मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार, या 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
या कारवाईत गुन्हे शाखेने दोन आरोपींना ताब्यात घेऊन एकूण 15 मोटारसायकली जप्त केल्या. यामध्ये 7 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई सोलापूर शहर पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शंकर धायगुडे यांच्या पथकाने केली. पथकात पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांचा समावेश होता.सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या या यशस्वी कारवाईमुळे चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.



