
सोलापूर दि:- ओमप्रकाश चव्हाण रा फताटेवाडी ता दक्षिण सोलापूर जि सोलापूर यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लक्ष्मण भिमशा पवार वय 45, लहू उद्धव जाधव वय 62, अनिल थावरू पवार वय 28 सर्व रा फताटेवाडी ता दक्षिण सोलापूर जि सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांच्यासमोर होऊन गुन्हा शाबित न झाल्याने त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या हकीकत अशी की, मयत ओमप्रकाश याने ज्योती राहुल जाधव हिच्या नावे फताटेवाडी येथे जमीन खरेदी केली होती. यातील आरोपी लक्ष्मण भिमशा पवार व लहू उद्धव जाधव यांची शेती ही मयताने खरेदी केलेल्या शेताच्या बाजूस होती व ते दोघे मयतास व त्यांच्या कुटुंबीयांना मयताने घेतलेल्या शेतात येण्यास प्रतिबंध करीत होते व त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत होते, त्यामुळे आरोपीविरुद्ध फिर्याद देखील दाखल झाली होती व दिवाणी दावा देखील कोर्टात दाखल होता. ज्यावेळी मयताच्या घरी पाईपलाईनचे काम चालू होते, तेव्हा आरोपी अनिल पवार याने ही जागा माझा चुलत भाऊ अनिल राठोड याची आहे, असे म्हणून काम बंद पाडले. सततच्या त्रासाला कंटाळून दि:- 25/7/2020 रोजी मयत ओमप्रकाश याने स्वतःस पेट्रोल ओतून जाळून घेतले व जळालेल्या जखमांमुळे दि:- 7/8/2020 रोजी मयत झाला, अशा आशयाची फिर्याद मयताचा मुलगा राहुल ओमप्रकाश चव्हाण याने वळसंग पोलीस ठाण्यात दिली होती.
मयताने मृत्यूपूर्व जबाब देखील दिला होता.
सरकारतर्फे एकंदर सात साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपींचे वकील ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात मयत ओमप्रकाश याच्यावरती सुनेने हुंडाबळीची केस केली होती, त्यामध्ये त्यास अटक झाली होती या घटनेमुळे तो मानसिक तणावाखाली असल्याची बाब उलट तपासात निष्पन्न झाली, तसेच मयताने दिलेला मृत्यूपूर्व जबाब तो देण्याच्या परिस्थितीत होता, असा पुरावा सरकारी पक्षाने शाबित केलेला नसल्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
*यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे ऍड दत्ता गुंड ऍड सचिन कोळी यांनी तर सरकारतर्फे ऍड दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.*