ठेवीदाराच्या खून प्रकरणे पतसंस्थाचालकाची निर्दोष मुक्तता…

बार्शी दि-
यात हकीकत अशी की, दिनांक 02/05/2014 रोजी मौजे देवळाली तालुका करमाळा येथील फॉरेस्ट मध्ये तेथील वनमजुरांना जंगलात फिरती ड्युटी करीत असताना लमान बाबा मंदिराजवळ कोरड्या ओढ्यामध्ये एक अनोळखी इसम मयत अवस्थेत पडलेला असून त्याचे डोक्यात मोठी जखम व तो अर्धवट जळालेला मिळून आला. तदनंतर सदर वनमजुरांनी घटनेबाबत त्यांचे वरिष्ठ वनरक्षक गोरखनाथ शिवप्पा माळी यांना माहिती दिली. त्यावरून त्यांनी सदर घटनेबाबत करमाळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व प्रेताजवळ पडलेल्या वस्तू जप्त करून पुढील तपास चालू केला.
दरम्यानच्या काळात म्हणजे दिनांक 04/05/2014 रोजी मयताचा नातू अक्षय ज्ञानेश्वर शिंदे याने त्याचे आजोबा विठ्ठल रामभाऊ टोणपे हे दिनांक 30/04/2014 रोजी आरोपी विश्वनाथ निवृत्ती मोगल यांच्याकडे जाऊन ठेवीचे पैसे घेऊन येतो म्हणून गेलेले होते व ते अद्याप परत न आल्याने त्यांची हरवले बाबत तक्रार देण्यासाठी करमाळा पोलीस स्टेशन येथे आले असता सदर वेळी बेवारस मयताचे काढलेले फोटो व घटनास्थळी मिळालेले वस्तू दाखविल्या नंतर सदर वस्तू या मयत विठ्ठल रामभाऊ टोणपे वय वर्ष 70 रा. दहिगाव तालुका करमाळा यांचेच असल्याचे पाहून सांगितल्या व त्याचे आजोबांनी आरोपीचे ज्ञानसागर पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवल्या होत्या व सदरच्या ठेवी परत करण्यावरून त्यांच्यामध्ये वाद होता व आरोपी हा वेळोवेळी त्यांना दमदाटी करत असल्याबाबत जबाब दिला.
तदनंतर यातील आरोपी विश्वनाथ निवृत्ती मोगल यास अटक करून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले. त्यावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.हसबनीस यांनी आरोपीविरुद्ध खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत आरोप पत्र दाखल केलेले होते.
सदर खटल्याची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के.मांडे साहेब यांचे समोर झाली.
या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.
आरोपीतर्फे एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी त्यांचे युक्तिवादामध्ये सदरचा खटला हा परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असून यामध्ये मयताची ओळख पटवणे हे अतिशय महत्त्वाचे असून त्याकरिता पोलिसांनी मताचे डी.एन.ए.घेणे अत्यंत महत्त्वाचे होते परंतु सदर प्रकरणी मयताचा डी.एन.ए सॅम्पल घेतलेला नसून सदरचा मृतदेह हा विठ्ठल टोणपे यांचाच होता का याबाबत शंकास्पद परिस्थिती असल्याचा युक्तिवाद केला, त्यावरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे व ॲड. निखिल पाटील यांनी तर सरकार तर्फे ॲड. डी.डी. देशमुख यांनी काम पाहिले.