निवडणूक वादातून जोशी गल्लीतील तरुणाची निर्घृण हत्या; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाच आरोपी अटकेत…

सोलापूर/प्रतिनिधी
शहरातील जोशी गल्ली, रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून बाळासाहेब पांडुरंग सरवदे (वय ३६) यांची तलवार व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २ जानेवारी) घडली. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मयताचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे (वय २५, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, आरोपींनी निवडणुकीत उभे राहू नये म्हणून धमकी दिली होती.
अपक्ष अर्ज मागे घ्या, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. दि. २ जानेवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४.४५ च्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यांत चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली. त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले, तर तलवार व कोयत्याने छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इतर कलमांसह मकोका १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी अमर शंकर शिंदे, शालन शंकर शिंदे, अतिश शंकर शिंदे, तानाजी बापू शिंदे व राहुल शिंदे या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली. दरम्यान, या हत्येमागे राजकीय दबाव व हस्तक्षेप असल्याचा आरोप होत असून संबंधित नेत्यांवरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून तपासाअंती जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



