बार्शीतील गाताची वाडी येथे बेकायदा दगड खाण सुरूच – महसूल प्रशासनाचा दुर्लक्ष, कोट्यवधींचा महसूल बुडाल्याची शक्यता…

बार्शी, सोलापूर
– बार्शी तालुक्यातील गाताची वाडी येथे शासनाच्या नावावर असलेल्या जमिनीत गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीररित्या दगड खाण सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महसूल विभागाकडून या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने या बेकायदा खाणीचा सोशल मीडियावर थेट लाईव्ह प्रसार केल्यानंतर ही संपूर्ण बाब उजेडात आली.
गाताची वाडी येथील गट क्रमांक ४ मधील जागा काही वर्षांपूर्वी दगड खाणीसाठी वापरली जात होती. मात्र, खाण मालकाने संबंधित महसूल न भरल्याने शासनाने या जागेवर हक्क दर्शवित उताऱ्यावर आपले नाव नोंदवले. या प्रक्रियेमुळे शासनाने या जागेवर कोट्यवधी रुपयांचा महसूल ठेवला आहे. तथापि, शासनाच्या ताब्यात असलेल्या या जागेत मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा उत्खनन सुरू असल्याचे समोर आले आहे.
बार्शी तालुक्यातील एका स्वयंघोषित माहिती अधिकार कार्यकर्त्याने सोशल मीडियावर या खाणीचा थेट लाईव्ह व्हिडिओ शेअर केल्यानंतर महसूल प्रशासन हरकत घेत तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी केवळ वरवरची पाहणी करून खान सुरू ठेवणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
थेट कारवाईनंतर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तीने उपस्थित पत्रकारांना ‘आमचं सगळं मिटले आहे, तुम्ही निघा’ असे सांगितल्याचे वृत्त आहे. या वाक्याचा अर्थ काय? महसूल विभाग आणि अवैध खाण व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तींच्या संगनमताचा हा पुरावा मानायचा का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणात महसूल प्रशासनाने जमिनीतून उत्खनन करणारी वाहने आणि स्फोटकांसंदर्भात कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने या व्यवसायाला महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या बेकायदा दगड खाणीतून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याची शक्यता आहे. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का? हा मोठा प्रश्न आहे.