india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

एका गायीपासून सुरू झालेली गोसेवा, आज बनली ‘गंगा गौरी गोशाळा’ – गोपालक नितीन पेंटर यांची प्रेरणादायी यात्रा…

वसुबारस निमित्त विशेष बातमी + विशेष लेख

 

सोलापूर, दि. ५ नोव्हेंबर :

 

दिवाळीचा पहिला दिवस असलेल्या वसुबारस निमित्त जुळे, सोलापूर येथील गंगा गौरी गोशाळा ट्रस्ट येथे गोमातेची विधिवत महापूजा करण्यात आली. गोपालक नितीन पेंटर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गायींना स्नान घालून, हळद-कुंकू, फुलांच्या माळा घालून, आरती करून गोमातेचा सन्मान केला. यावेळी गोशाळेत नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन गोमातेचे दर्शन घेतले.

 

 

रेशन संघटनेचे जिल्हाप्रमुख नितीन पेंटर हे आज सोलापूरमध्ये केवळ एका संघटनेचे पदाधिकारी म्हणून नाही, तर एक निष्ठावान गोपालक म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच वर्षांपासून ते अखंडपणे, न चुकता गोसेवेत आहेत.

एका भेटीतून जन्माला आलेली गोसेवा

या गोसेवेची सुरुवातही तितकीच हृदयस्पर्शी आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रांनी त्यांना भेट म्हणून गीर जातीची एक गाय दिली. ती गाय म्हणजे केवळ भेट नव्हती, तर त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा आशीर्वाद ठरली.

सुरुवातीला त्या एका गायीची सेवा करताना त्यांना गायींबद्दलची आवड, माया, जिव्हाळा दिवसेंदिवस वाढत गेला. एका गायीचे दोन झाल्या, दोनाच्या चार… आणि आज त्यांच्या गोशाळेत अनेक गीर गायी आनंदाने नांदत आहेत.

आज जुळे, सोलापूर सारख्या उच्चभ्रू भागात त्यांची *‘गंगा गौरी गोशाळा ट्रस्ट’* नावाची सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न गोशाळा उभी आहे. ही गोशाळा कोणत्याही मोठ्या देणगीतून नाही, तर त्यांच्या स्वतःच्या कष्टातून आणि कुटुंबाच्या साथीतून उभी राहिली आहे.

शेत नसतानाही थांबली नाही गोसेवा

सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचे शेत नसतानाही त्यांनी गोसेवा थांबवली नाही. जुनी मिल कंपाऊंड येथून रोज चारा विकत आणणे, गायींना लागणारे पाणी, औषध, उपचार हे सर्व ते स्वतः लक्ष घालून करतात. सकाळ असो वा संध्याकाळ, कुटुंबासह नित्यनियमाने ते गोमातेची पूजा, सेवा आणि देखभाल करतात.

पद, प्रतिष्ठा, व्यवसाय सांभाळताना देखील गोमातेसाठी वेळ काढणे, हीच खरी भक्ती आहे. दुष्काळाच्या काळात जेव्हा अनेकजण गायी सांभाळणे कठीण म्हणून सोडून देतात, तेव्हा नितीन पेंटर मात्र स्वतःचा घास कमी करून गोमातेचा घास भरवतात.

‘एक मूठ धान्य गोमातेसाठी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

यावेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर *‘एक मूठ धान्य गोमातेसाठी’* या विशेष उपक्रमाची घोषणा करण्यात आली. यातून जमा होणारे धान्य गोशाळेतील गायींच्या चाऱ्यासाठी वापरण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना नितीन पेंटर म्हणाले, “गोमाता हीच आमची खरी लक्ष्मी आहे. दुष्काळात माणूस उपाशी राहू शकतो, पण गोमाता उपाशी राहता कामा नये. म्हणून प्रत्येकाने आपल्या वाट्यातून फक्त एक मूठ धान्य गोमातेसाठी बाजूला काढावे, हेच खरे पुण्य आहे.”

> दुष्काळाची काळी छाया, गोमाता आज उपाशी,
> पाण्याविना चाऱ्याविना, डोळ्यात तिच्या आसूंची रासी.
> एक मूठ धान्य दिले तर, भागेल तिची भूक खरी,
> हेच पुण्य, हेच दान, हीच खरी गौसेवा सरी !

वसुबारसच्या या पवित्र दिवशी त्यांची ही गोसेवा आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button