आषाढी वारी शांततेत पार पडण्यासाठी 272 सराईत गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांची तंबी…

सोलापूर :
आषाढी वारी व संतांच्या पालखी सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली आहे. दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर व क्रिमिनल गुंडा अशा एकूण 272 जणांना सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात बोलावून शांतता राखण्याबाबत कडक समज देण्यात आली.
दि. 19 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातून संतांच्या पालख्या मार्गक्रमण करणार असून, आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांसह बाहेरील जिल्ह्यांतून मागविण्यात आलेले सुमारे 10 हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.
याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट, बार्शी व मंगळवेढा उपविभागातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर व क्रिमिनल गुंडा अशा 272 जणांना पोलीस मुख्यालयात पाचारण करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संबंधितांना आषाढी वारीच्या काळात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. भविष्यात कोणताही दखलपात्र गुन्हा घडणार नाही, अशी स्पष्ट सूचना देत त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्रही लिहून घेण्यात आले.

या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संतांची आषाढी वारी शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावी, यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसह व्यापक नियोजन केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.



