कामतीत अल्लाउद्दीन बाबा उरुस ७-८ मे रोजी; संदल मिरवणूक, यात्रा आणि जंगी कुस्त्यांचे आयोजन…

सोलापूर
मोहोळ तालुक्यातील कामती बु. येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अल्लाउद्दीन बाबा यांचा पारंपरिक उरुस ७ व ८ मे रोजी उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या गुरुवार-शुक्रवारी हा उरुस भरविण्याची परंपरा असून, यंदाही मोठ्या भक्तिभावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उरुसाच्या निमित्ताने ७ मे रोजी गावातून संदल मिरवणूक काढण्यात येणार असून ८ मे रोजी कामती गावची यात्रा भरविण्यात येणार आहे. या उरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्मीय बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग असतो. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या उरुसात परिसरातील भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.

याच उरुसानिमित्त १० मे रोजी जंगी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून दुपारी २ ते ४ या वेळेत कुस्त्या रंगणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष अफसर मुजावर, सचिव समीर मुजावर तसेच नामदेव खराडे वस्ताद यांनी केले आहे.



