crimemaharashtrapoliticalsocialsolapur

विजयपूरमध्ये ऑटो चालकाची निर्घृण हत्या; बंजारा क्रॉस परिसरात खळबळ

विजयपूर | प्रतिनिधी

(दिपक शिंत्रे)

 

विजयपूर शहरातील बंजारा क्रॉस परिसरात एका ऑटो चालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताची ओळख ख्वाजा अमीन दर्गा परिसरातील रहिवासी व ऑटो चालक विलास नडविणमणी (वय ३०) अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास नडविणमणी हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑटो रिक्षा चालवत होते. बंजारा क्रॉस परिसरात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पत्नी, आई-वडील व नातेवाईकांनी मृतदेह पाहून आक्रोश केला.

 

 

कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या विलास यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

 

 

वैयक्तिक वैर, जुना वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून ही हत्या झाली असावी, या दृष्टीने पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे विजयपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button