बदलत्या काळानुसार ढोर समाजाने संघटीत होवून आपला विकास साधला पाहिजे – माजी आमदार ज्ञानराज चौगुले…

समाजाअंतर्गत जनगणना करण्यासाठी समिती स्थापन
सोलापूर, (प्रतिनिधी)ः- गेल्या अनेकवर्षापासून ढोर समाज कातडी कमावणे हा पारंपारिक व्यवसाय करत असताना सवर्णांकडून समाजाला अस्पृश्य केले होते. अनेक अन्याय अत्याचार सहन करणारा ढोर समाज एकत्र येवून संघटीत झाला पाहिजे आणि बदलत्या काळानुसार आपली प्रगती साधली पाहिजे असे प्रतिपादन उमरगा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले. हॉटेल सुर्या इंटरनॅशल मध्ये महाराष्ट्र राज्य ढोर समाज कृतीशील कार्यकर्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वीज मंडळाचे निवृत्त मुख्यअभियंता लक्ष्मीदास सोनकवडे होते. तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कक्कय्या महासंघाचे उपाध्यक्ष अॅड जांबुवंतराव सोनकवडे, डॉ. पीपी पोळ,डॉ. दिनेश कदम, डॉ. रायप्पा कटके, पुंडलिक खरटमोल,लक्ष्मण होटकर,अनिल पोळ, मुकुंद सोनटक्के,किशोर कवडे, गणेश नारायणकर,सुदेश व्हटकर,राहुल सोनवणे, प्रकाश व्हटकर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून समाजबांधवांनी सहभाग घेतला होता.
शाहु , फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना माननारा हा ढोर समाज आहे. संघर्ष हा ढोर समाजाला नवीन नाही त्यातून आजच्या काळातही नैसर्गिक न्यायहक्कासाठी अनेकदा संघर्ष करावा लागत आहे. त्यासाठी समाजातील सर्वच संघटना, समाज मंडळांनी एकत्र येवून सरकार दरबारी आपल्या मागण्या मांडल्या पाहिजेत असेही चौगुले यांनी सांगितले.
मागासलेला ढोर समाज अस्पृश्य आहे असे वर्षानुवर्षे समजणार्यांनी आता अनुसुचित जाती मध्ये सहभागी होवून मागासवर्गीय समाजाचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याने त्यासाठी लक्ष्मीदास सोनकवडे यांनी पुढाकार घेतला आणि बैठक घेवून समाजात चांगले काम केले आहे. असे सुधीर खरटमल यांनी सांगितले.
आगामी काळात संपूर्ण देशात जनगणना होणार आहे त्यापुर्वी समाजातील सर्वच बांधवांची जनगणना करणे गरजेचे आहे. असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून लक्ष्मीदास सोनकवडे यांनी सांगितले आणि त्यानुसार जनगणना समितीचे गठण करण्यात आले.
आगामी काळातील जात वर्गीकरणामध्ये ढोर समाजाची काय भुमिका असावी याबाबत मुंबईहून आलेले तज्ञ रविंद्र शिंदे यांनी सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती दिली. वर्ग एक, वर्ग दोन पासून न्यायाधीश या पदावर आजही एस सी एस टीच्या जागेवर खुल्या वर्गातील लोकांना स्थान दिले जाते. असे परखड मत जांबुवंतराव सोनकवडे यांनी मांडले. तर पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य ठरवलेल्या जातीत जंगमासारखे स्पृश्य जातीला अनुसुचित जातीत स्थान देवून अस्पृश्य समाजाचे नैसर्गिक न्याय हक्क डावलून अन्यायाने आरक्षणाचे फायदे लाटले जात आहेत. यासाठी सर्वांनी एकत्र येवून संघर्ष केला पाहिजे असे पी पी पोळ यांनी सांगितले.
ढोर समाजाचे अखिल भारतीय स्तरावर सर्व्हेक्षण होवून जनगणना कशी करावी याबाबत माहिती तंत्रज्ञान अभियंता ओंकार व्हटकर यांनी सविस्तर सांगितले. प्रारंभी सच्चिदानंद व्हटकर आणि अॅड. विद्या कटकधोंड यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सदाफुले यांनी केले.तर आभार राजेश कटकधोंड यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यशाळेत साहित्यिक बाबुराव इंगळे, विनायक होटकर, सुनिल व्हटकर, तिपण्णा इंगळे, मुन्ना कटके, विनोद होटकर, जितेंद्र होटकर, सागर नारायणकर, सुरेश कावळे, श्रीगणेश शिंदे यांनी चर्चेच्या माध्यमातून सहभाग नोंदवला.