बनावट गहाणखत करून एक कोटी चे कर्ज लाटले आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला…..

सोलापूर-
मजरेवाडी तालुका उत्तर सोलापूर , सोलापूर महापालिका हद्दीतील नवीन सिटी सर्वे नंबर 150/1ब/1अ/1 या मिळकतीच्या मालक सदरी नाव नसताना सुद्धा बनावट गहाणखत करून एक कोटीची रक्कम बँकेशी संगणमत करून लाटलेल्या प्रकरणीच्या दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी तोहिद आय्युब शेख वय -50 वर्षे रा. जोडभावी पेठ सोलापूर याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला.
यात हकीकत अशी की, यातील आरोपी तोहिद आय्युब शेख यांनी सन 2013 साली यातील फिर्यादीची व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मजरेवाडी तालुका उत्तर सोलापूर, सोलापूर महापालिका हद्दीतील नवीन सिटी सर्वे नं. 150/1ब/1अ/1 या मिळकतीमधील पश्चिमेकडील 0.25.35 आर इतकी मिळकत मालकी हक्क नसताना निळकंठ बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आरोपी हरीश राधाकिशन सारडा यांना हाताशी धरून संगणमत करून व बनावट उतारा तयार करून त्याद्वारे सोलापूर येथील सह. दुय्यम निबंधक वर्ग-२ कार्यालयात दस्त क्रमांक 364/2013 ने बनावट जादा गहाणखत केले आहे.त्यापोटी 40 लाख अधिक 35 लाख अधिक 25 लाख असे एकूण एक कोटी रुपयांचे कर्ज निळकंठ बँकेकडून घेतले आहे. अशाप्रकारे यातील आरोपी यांनी फिर्यादी त्यांच्या कुटुंबीयांची व शासनाची फसवणूक केली आहे. तसेच सदर मिळकती मधील 0. 4.65 आर इतकी मिळकत यातील आरोपी तोहिद आय्युब शेख याने स्वतःच्या बेकायदेशीर फायद्यासाठी तीऱ्हाईतस विक्री करून मिळालेली रक्कम स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता वापरून जमीन हडप केली आहे.अशा स्वरूपाची फिर्याद आफताब लतीफ कारिगर यांनी दिनांक 26-11-2024 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे आरोपीं नामे तोहीद आय्युब शेख व हरीष राधाकिशन सारडा यांचे विरुद्ध दाखल केली होती. त्याप्रमाणे फसवणूक बनावट कागदपत्रे याखाली गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये अटकेची शक्यता निर्माण झाल्यामुळे या कामी यातील आरोपी तोहिद आय्युब शेख याने सोलापूर येथील मे. सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी सरकारी वकील दत्तूसिंह पवार मूळ फिर्यादी तर्फे वकील अँड. शशी कुलकर्णी, अँड. ओंकार बुरकुल व अँड.देवदत्त बोरगावकर यांनी आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जास युक्तिवाद करून तीव्र विरोध केला. त्या जामीन विरोधात युक्तिवाद करताना कोर्टास असे निदर्शनास आणून दिले की सदर गुन्ह्याच्या तपासाकरिता आरोपीची कोठडीतील पोलीस चौकशी होणे गरजेचे आहे, तसेच आरोपींनी संगणमताने कशाप्रकारे बनावट कागदपत्रे तयार केली,तसेच 2013 साली रक्कम रुपये एक कोटी चे कर्ज घेऊन बनावट गहाणखत करून फिर्यादीची व शासनाची कशी फसवणूक केल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली, आरोपी तोहिद शेख वर यापूर्वीही अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे ही बाब ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून आरोपीच्या अटकपूर्व जामीनास विरोध केला .
वर नमूद युक्तिवादाचे मुद्दे व इतर मुद्दे विचारात घेऊन गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याच्या तपासाबाबत ही निरीक्षणे नोंदवून सोलापूर येथील सत्र न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
याप्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील दत्ता पवार, मूळ फिर्यादीतर्फे अँड. शशी कुलकर्णी, अँड. ओंकार बुरकुल व अँड. देवदत्त बोरगावकर तर आरोपी तर्फे अँड. कदिर औटी यांनी काम पाहिले.
( फौजदारी जामीन अर्ज क्र.११९८/२०२४ अति सत्र न्यायाधिश जयदीप ज. मोहिते सो)