बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणात आरोपी नाईकवाडी व खानापुरे यांच्या दोषमुक्ती अर्जावर तपासी अधिकाऱ्यांचे म्हणणे दाखल:-ॲड. शशी कुलकर्णी

सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील सहाय्यक अभियंता झाकीर अल्लाबक्ष नाईकवाडी तसेच कनिष्ठ अभियंता श्रीकांत बसण्णा खानापुरे, रा. सोलापूर यांनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जावर तपास अधिकाऱ्याचे म्हणणे दाखल.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत झाकीर नाईकवाडी व श्रीकांत खानापुरे हे सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. सदर कालावधीत त्यांनी आवश्यक अधिकार नसतानाही बांधकाम परवाने मंजूर केल्याचा तसेच त्याद्वारे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी बांधकाम विभागाचे अभियंता बसवराज मठपती यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान सदर बझार पोलिसांनी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी आरोपी झाकीर नाईकवाडी व श्रीकांत खानापुरे यांना अटक केली होती.
पोलिसांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास करून मुख्य न्यायदंडाधिकारी सोलापूर येथे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सदर प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपी नाईकवाडी व खानापुरे यांच्या वतीने ॲड. शशी कुलकर्णी यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, सोलापूर येथे दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. या दोषमुक्ती अर्जावर सरकारी पक्ष तसेच तपासी अधिकाऱ्यांनी आपले म्हणणे सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते . न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तपास अधिकाऱ्याने दोषमुक्ती अर्जावर म्हणणे दाखल करून आरोपीना दोषमुक्त करण्यास तीव्र विरोध केला आहे.प्रकरणाची पुढील सुनावणी दिनांक 05/10/2026 रोजी होणार आहे.
सदर प्रकरणात आरोपींतर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड. गुरुदत्त बोरगावकर व ॲड. आदित्य अदोने ॲड. प्रसाद अग्निहोत्री हे काम पाहत आहेत.
आर.सी.सी. क्र. ९६२/२०२५



