हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तिरंगा वॉक उत्साहात; विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने शहर दुमदुमले

सोलापूर :
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत ‘तिरंगा वॉक’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हातात तिरंगा, देशभक्तीपर घोषवाक्यांचे फलक व कापडी बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचा संदेश दिला.
या तिरंगा वॉकमध्ये सेवासदन प्रशाला, हरीभाई प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला आणि श्रीसिद्धेश्वर प्रशाला या शाळांमधील सुमारे ५०० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थी व शिक्षकांनी शहरातील विविध ठिकाणांहून तिरंगा हातात घेऊन वॉकला सुरुवात केली. सरस्वती चौक–पार्क चौक, हरीभाई मैदान–जुना एम्प्लॉयमेंट चौक–डफरीन चौक तसेच पासपोर्ट ऑफिस–श्रीसिद्धेश्वर मंदिर–डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशा विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत सर्व तिरंगा वॉक सोलापूर महानगरपालिका आवारात दाखल झाले. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
महानगरपालिका आवारात दाखल झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले. मा. उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर, कामगार व समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा पवार व नगरसेवक बिज्जू प्रधाने यांच्या शुभेच्छा व मार्गदर्शनाने तिरंगा वॉकचा सांगता व समारोप करण्यात आला.
यावेळी मा. उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “‘हर घर तिरंगा’ हे अभियान केवळ घरावर तिरंगा फडकविण्यापुरते मर्यादित नसून प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारे अभियान आहे. आजच्या तिरंगा वॉकमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून निश्चितच अभिमान वाटतो. हातात घेतलेला तिरंगा हा आपल्या देशाची अस्मिता, शौर्य, त्याग आणि एकतेचे प्रतीक आहे.
स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव ठेवून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशभक्तीचा हा संदेश घराघरात आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल, असा विश्वास आहे.”
कामगार व समाजकल्याण समिती सभापती श्रद्धा पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “आजच्या तिरंगा वॉकमधून विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची भावना प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केली आहे. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, संविधानाविषयी आदर आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा आणि देशाच्या विकासासाठी आपले योगदान द्यावे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे.”
नगरसेवक बिज्जू प्रधाने यांनीही तिरंगा वॉकमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा, नगरसेविका वाहिदा शेख, नगरसेवक प्रशांत पल्ली, उपायुक्त सोनाली यादव, मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर, प्रशासन अधिकारी माने, सहाय्यक आयुक्त युवराज गाडेकर, समाज विकास अधिकारी अजित खानसोळे, पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे, पशुसंवर्धन अधिकारी सतीश चौगुले, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी, लाईट विभाग अधीक्षक इंगळे, उद्यान विभाग अधीक्षक कोमल काशीद, पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलंकर, किरण पवार यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
तिरंगा वॉकच्या सांगता समारोपानंतर सहभागी विद्यार्थ्यांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने चहा, बिस्कीट, केळी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंदाने अल्पोपहाराचा आस्वाद घेतला.

देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा तिरंगा वॉक सोलापूर महानगरपालिकेच्या ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानातील एक उल्लेखनीय उपक्रम ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत झाली.
🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳



