crimemaharashtrapoliticalsocialsolapur

Breaking:-अपंगत्वाचे बनावट ओळखपत्र बनवुन देणारा, सोलापूर एस.टी महामंडळातील कंत्राटी चालक अटकेत….

दि.०९/०४/२०२५ रोजी, गुन्हे शाखेकडील सपोनि/शैलेश खेडकर यांना माहिती मिळाली की, इसम नागे संगमेश्वर अळगुंडगी हा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर डेपो मध्ये कंत्राटी चालक म्हणून नोकरीस असून, तो एस.टी मध्ये प्रवाशांना तिकीटामध्ये सवलत मिळण्याकरीता, अपंगत्वाचे बनावट स्मार्ट कार्ड बनवुन देतो., अशी माहिती मिळाल्याने, सपोनि/शैलेश खेडकर यांनी, अळगुंडगी याचा मोबाईल नंबर प्राप्त केला. त्यानंतर, सपोशि/शैलेश खेडक्र यांनी, सदर माहितीची खातरजमा करण्यासाठी, एक बोगस गि-हाईक व्यक्ती यांना बोलावुन, त्याद्वारे, बनावट स्मार्ट कार्ड बनवुन देणा-या व्यक्तीस रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा लावला.

त्यानंतर, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने बोगस गि-हाईक व्यक्तीस, संशयीत इसम नामे-संगमेश्वर अळगुंडगी यांचे मोबाईलवर संपर्क साधून, त्याला अपंगत्वाचे कार्ड काढून हवे आहे? अशी विचारणा केली असता, अळगुंडगी याने बोगस गि-हाईक व्यक्तीस, तुम्हाला परमनंट कार्ड हवे आहे का? पाच वर्षासाठी हवे आहे, अशी विचारणा केली असता, बोगस गि-हाईक व्यक्तीने त्याला कामाचे निमित्ताने, नेहमी संपूर्ण सोलापूर जिल्हयात सतत प्रवास करावा लागतो, त्यासाठी भरपूर पैसे खर्च होतात, म्हणुन तुम्ही मला परमनंटच स्मार्ट कार्ड काढून दया, असे सांगितले. त्यावर, अळगुंडगी याने परमनंट कार्डसाठी रु.२५००/- व पाच वर्ष मुदत कालावधीचे कार्डसाठी रु.२०००/- द्यावे लागतील असे सांगितले. त्यावर बोगस गि-हाईक व्यक्तीने मी आता तुम्हाला किती रुपये पाठवु व तुम्ही मला कार्ड कधी बनवून देता? असे विचारले असता, संशयीत इसम अळगुंडगी याने, त्याचे मोबाईलवर ५००/-रु., आधार कार्ड व फोटो पाठवा व राहिलेले २०००/- रुपये मी कार्ड बनवुन दिल्यानंतर दया, असे सांगून मी फोन केल्यावर, तुम्ही कार्ड घेण्यासाठी रंगभवन चौकाजवळ या, असे सांगितले. त्यामुळे, बोगस गि-हाईक व्यक्ती यांनी, लागलीच अळगुंडगी याचे मोबाईलवर, फोन पे द्वारे ५००/- रु पाठविले, तसेच वॉट्सअॅपवर आधारकार्ड व फोटो पाठविले.

त्यानंतर, संशयीत व्यक्ती अळगुंडगी याचा, बोगस गि-हाईक व्यक्तीस सायंकाळी १७:४५ वा. चे सुमारास फोन आला व त्याने रंगभवन चौकातील शितलादेवी मंदिराजवळ बनविलेले कार्ड घेण्यासाठी या, असा निरोप दिला. त्याप्रमाणे, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने, शितलादेवी मंदिर, रंगभवन सोलापूर या ठिकाणी जावून सापळा लावला असता, एक एस.टी महामंडळाचा ड्रेस अंगावर असलेला व्यक्ती, बोगस गि-हाईक व्यक्तीजवळ आला व त्याने, मीच संगमेश्वर अळगुंडगी आहे व हे तुमचे अपंगत्वाचे स्मार्ट कार्ड घ्या, असे म्हणाला. सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे पास पथकाने, लागलीच त्यास ताब्यात घेवून, त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव संगमेश्वर मल्लीकार्जुन अळगुंडगी, वय-३८ वर्षे, व्यवसाय कंत्राटी चालक, एस.टी महामंडळ सोलापूर डेपो सध्या रा. घर नं.१३, कर्णीक नगर, सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यावेळी, पोलीसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याचेजवळ बोगस गि-हाईक व्यक्तीचे बनविलेले अपंगत्वाचे ओळखपत्र, त्याने स्वतःचे बनविलेले अपंगत्वाचे ओळखपत्र अशी दोन बनावट अपंगत्वाची ओळखपत्रे व दोन मोबाईल फोन असे साहित्य त्याचेकडे मिळून आले.

सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने संगमेश्वर अळगुंडगी यास तपासकामी ताब्यात घेवून, त्याचेकडे कौशल्याने तपास केला असता, त्याने त्याचे मोबाईल मधील, क्यु.आर. कोड जनरेटर अॅप व पिक्सेललॅब अॅप या अॅपचे सहायाने मोबाईलमध्येच तो अपंगत्वाबाबतचे बनावट ओळखपत्र बनवितो, तसेच एडीटींग करुन बनविलेली फोटो प्रिंट, ओळखीच्या दुकानदाराकडे वॉटसअॅपवर पाठवून, त्याची प्रिंट काढून घेतो असे सांगून, अपंगत्वाची बनावट ओळखपत्र तो स्वतः बनवत असल्याचे कबूल केले. त्यामुळे, सपोनि शैलेश खेडकर यांचे पथकातील पो. कॉ. १४४७विनोद रजपुत, नेमणुक गुन्हे शाखा, सोलापूर शहर यांनी अपंगत्वाची बनावट ओळखपत्र बनवुन देणारा सोलापूर एस.टी डेपो मधील चालक संगमेश्वर मल्लीकार्जुन अळगुंडगी वय-३८ वर्षे, व्यवसाय कंत्राटी चालक, एस.टी महामंडळ सोलापूर डेपो सध्या रा. घर नं.१३, कर्णीक नगर, सोलापूर याचे विरुध्द त्याने शासनाची फसवणुक

केलेबाबत फिर्याद दिल्याने, सदर बझार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजि नं. ३१५/२०२५ भा. न्या.सं. २०२३ कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३). ३४० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात आरोपीस अटक करण्यात आली असून, त्यास, मा. न्यायालयाने, दि.१३/०४/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि श्री शैलेश खेडकर, नेमणुक गुन्हे शाखा, सोलापूर शहर हे करीत आहेत.

याद्वारे, सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, याच प्रकारे संगमेश्वर अळगुंडगी याचेकडून अपंगत्वाचे बनावट ओळखपत्र कोणी काढून घेतले असल्यास, किंवा या प्रकाराबाबत कोणाला काही अधिक माहिती द्यावयाची असल्यास, त्यांनी, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल दोरगे मो. नं. ९८२३७७०५९९ व तपास अधिकारी श्री. शैलेश खेडकर मो. नं. ७७०९६८७९७२ यांचेशी संपर्क साधून माहिती दयावी

ही कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापुर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे/वि.शा.. श्री. राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि. श्री. शैलेश खेडकर, गुन्हे शाखा, सोलापूर शहर, व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड यांनी केली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button