crimemaharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर रेल्वे स्थानकावर पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यांमध्ये रंगला थरार….

तित्तर पक्षांची करत होते तस्करी...

सोलापूर

 

दुपारी मुंबईहून विशाखापट्टणम ला जाणारी गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर उभी होती. नाग फाउंडेशनचे सिद्धेश्वर मिसालेलू हे काही कामानिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावर गेले असता त्यांना काही इसम संशयितरित्या फिरत असताना त्यांनी पाहिले. त्यांच्या जवळ पिंजरे होते व एका पिंजऱ्यात काही राखी तित्तर पक्षी होते. या पक्षांना पाळण्यास, वाहतूक करण्यास सक्त मनाई आहे. हे पाहून सिद्धेश्वर यांनी त्या शिकऱ्यांजवळ विचारणा करताच आम्ही पक्षी पाळणारे लोकं आहोत असे उत्तर दिले. ते 8 ते 10 जण होते. त्यात महिलाही होत्या. सिद्धेश्वर यांनी ही घटना सोलापूरचे वन्यजीव अभ्यासक राहुल शिंदे यांना कळविली. हे ऐकताच शिंदे यांनी संभावित धोका ओळखून सिद्धेश्वर यांच्या मदतीला नाग फाउंडेशनच्या विनोद गायकवाड व मंगेश शिंदे यांना पाठविले व त्वरित मदतीसाठी पोलिसांना कळविण्यास सांगितले.

 

 

 

 

सिद्धेश्वर यांनी बाकीचे सदस्य पोहोचेपर्यंत त्या शिकऱ्यांकडून पक्षी असलेला पिंजरा हस्तगत केला. हे बघताच त्या शिकऱ्यांन गयावया करण्यास सुरुवात केली. शिवाय पैसेही देण्याचा प्रयत्न केला. परंतु सिद्धेश्वर यांनी त्यांचे काहीएक न ऐकता आरपीएफ पोलिसांना कळविले. हे पाहून अजून दोघे-तिघे रेल्वेतून बाहेर येऊन सिद्धेश्वर यांना धक्काबुक्की करत ढकलून पळून गेले. तितक्यात तेथे आलेले पोलीस व नाग फाउंडेशनच्या अन्य सदस्यांनी त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु शिकारी तोपर्यंत फलाट क्रमांक 1 वरून 3 वर गेले होते. त्यांच्याकडे 3 ते 4 प्रकारचे पिंजरे व जाळ्या होत्या. त्या सर्वांनी विजापूरकडे जाणाऱ्या गाडीत धाव घेतली.

 

 

 

शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यापर्यंत पोहोचण्या आधीच गाडी हलली. ही घटना वनविभागाला कळविण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होईपर्यंत काहीकाळ पक्षी व पिंजऱ्याला पोलिसांकडे ठेवण्यात आले. नंतर या पक्षांना विभागाच्या ताब्यात देऊन त्यांची मुक्तता करण्यात आली. या थरारक घटनेमुळे आपल्या जीवाची पर्वा न करता त्या पक्षांची सुटका करणाऱ्या या धाडसी नाग फाउंडेशनच्या वन्यजीव प्रेमींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

 

 

तित्तरसारख्या पक्षांची शिकार वाढली असून शिकारीचे लोण आता एका गावाहून दुसऱ्या गावात रेल्वेद्वारे सहजरीत्या पोहचत आहे. तित्तर हा पक्षी वन्यजीव अधिनियम 1972 (सुधारणा 2022) अंतर्गत अनुसूचि 2 मध्ये असल्याने त्याची शिकार करणे, तस्करी करणे, जवळ बाळगणे यास बंदी असून असे करणाऱ्यास दंडाची व शिक्षेची तरतूद आहे. शिवाय एखादा विषारी साप अथवा प्राणी अवैध वाहतुकीदरम्यान सुटल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. अशी अवैध वाहतूक रोखण्याकरिता रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.

वन्यजीव अभ्यासक राहुल शिंदे, नाग फाउंडेशन.

 

गेल्या काही महिन्यांपूर्वी सोलापूर रेल्वे स्थानकावर सापाची अवैध रित्या होणारी वाहतूक थांबवून आमच्या टीमच्या सदस्यांनी डूरक्या घोणस साप हस्तगत केला होता. तेव्हा रेल्वे स्थानकावर कन्व्हेयर बेल्ट स्कॅनर मशीनची मागणी आमच्या संस्थेकडून करण्यात आली. परंतु त्याची दखल न घेतल्याने सापाची, पक्षांचे व इतर वन्यजीवांची रेल्वेतून अवैध वाहतूक नित्याचीच झाली आहे. रेल्वे प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून तात्काळ कारवाई केली पाहिजे.

विनोद गायकवाड, उपाध्यक्ष, नाग फाउंडेशन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button