crimemaharashtrapoliticalsocialsolapur

वैभव वाघे खून खटला:- योगेश ऊर्फ सोन्या अस्वले याचा जामीन फेटाळला….

 

सोलापूर-

सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसेच पिडीत महिला, रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड यांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी गायकवाड, हर्षजीत गायकवाड, संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे, योगेश ऊर्फ सोन्या अस्वले यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून व जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. त्यापैकी योगेश ऊर्फ सोन्या अस्वले याने पोलिसांनी तपास पूर्ण करून सत्र न्यायालयात दोषरोपपत्र दाखल केल्याने नियमित जामिनासाठी सोलापूर येथील सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज मे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे सो यांनी फेटाळून लावला.

 

 

यात हकिकत अशी कि, दि.१/१/२५ रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीमा कोरेगाव पुणे येथे शौर्य दिन साजरा करण्यासाठी सिध्दार्थ हौसिंग सोसायटीतील रिंकि शिवशरण, अदित्य दावणे, पुथ्वीराज शिरसे व रितेश गायकवाड हे थांबले असताना त्यावेळी बुद्ध विहारजवळ सर्व आरोपी हे त्यांच्या कुटुंबासह थांबलेले होते. त्यावेळी सनी निकंबे हा दारु पिऊन पिडीत महिलेच्या अंगावर आला, प्रमोद गायकवाड पट्टा काढून अदित्य दावणे यास मारहाण करू लागला. त्यावेळी ऋतूज गायकवाड व रिकी शिवशरण यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता प्रमोद गायकवाड याने प्रसेनजीत उर्फ लकी, हर्षजीत उर्फ विकी व संजय उर्फ सोन्या या तिघांना आवाज देऊन “गाडीतील रॉड काढून घेऊन या, या लोकांना माज आलेला आहे, कुठले भिकारडे येथे आलेले आहेत”, असे ओरडून शिविगाळी करून त्यांना बोलावून घेतले. सर्वजण लोखंडी रॉड घेऊन आल्यानंतर सर्वांनी मिळून पिडीत महिला, रितेश गायकवाड, सुमित गायकवाड यांना मारहाण केली, त्यावेळी कोण जर यांच्या मदतीला आले तर त्यांना देखील आम्ही सोडणार नाही असे ओरडल्याने कोणी मदतीला आले नाही. परंतु निलेश शिरसे व सागर शिरसे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही सर्व आरोपींनी मारहाण केली.

 

 

 

त्यानंतर काही वेळाने वैभव उर्फ बंटी वाघे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी मिळून त्यास मारहाण केली. त्यावेळी वैभव वाघे हा गाडीवरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असता समरसेनजीत उर्फ टिपू गायकवाड याने त्याला अडवून पाडले व रस्त्यावरून फारशी उचलून वैभव वाघे च्या डोक्यात घातली. त्यावेळी पुन्हा प्रमोद गायकवाड सह सर्व आरोपींनी मिळून लोखंडी रॉड व लाकडी दंडुकाचे सहाय्याने त्याचे सर्वांगावर मारहाण केली. प्रमोद गायकवाड याने लोखंडी रॉडने वैभव वाघे याचे हात, पाय, तोंड, व डोक्यात मारले, प्रसेनजीत गायकवाड, संजय गायकवाड, हर्षजीत गायकवाड यांनी लोखंडी रोडने त्याचे हातापायावर, डोक्यावर, पाठीवर, व शरीरावर मिळेल तिथे मारहाण केली. अजित गायकवाड व किरण अंकुश यांनी लाकडी बांबूने मारहाण केली. प्रमोद गायकवाड व सर्व आरोपींच्या दहशतीमुळे वैभव वाघे यास सोडविण्यास कोणीही पुढे आले नाही. वैभव वाघे हा मोठमोठ्याने रडत होता परंतु सर्व आरोपी त्यास अमानुषपणे मारहाण करीत राहिले. तो रक्तबंबाळ होऊन पडल्यानंतर सर्व आरोपी निघून गेले. वैभव वाघे यास सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर दि. ०६/०१/२०२५ रोजी तो मरण पावला.

 

 

 

यातील अटकेतील आरोपी योगेश ऊर्फ सोन्या अस्वले यांने दोषारोपपत्र दाखल झाल्याने नियमित जामीन मिळण्यासाठी मे.अतिरिक्त सञ न्यायाधीश श्री.एस.व्ही.केंद्रे सो यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता.
यामध्ये मुळ फिर्यादीतर्फे अँड. संतोष वि. न्हावकर यांनी फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र दाखल करून, आरोपीने मयतास गाडी वरून पाडून लोखंडी राँडने व फरशीने मारहाण करून जीवे ठार मारल्याचे तसेच आरोपीविरद्ध पूर्वी ५ गुन्हे दाखल असल्याचे व आरोपींविरुद्ध मोक्का कायद्या अंतर्गत कलम वाढविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात रिट दाखल केले असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले व आरोपीस जामीन देण्यास विरोध केला होता.

तसेच सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अँड दत्तूसिंग पवार यांनी आरोपींनी संगनमत करून व कट रचून खून केला असल्याचे मे.न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.सदरचा युक्तिवाद ग्राह्य माणून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.

यात मुळ फिर्यादीतर्फे अॅड. संतोष वि. न्हावकर, अॅड. राहुल रुपनर, अॅड. शैलेश पोटफोडे, सरकार पक्षातर्फे अँड.दत्तूसिंग पवार तर आरोपीतर्फे अँड. शशी कुलकर्णी हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button