लाड कमिटी अंतर्गत १४ जणांना महापालिकेत नियुक्ती; पारदर्शक प्रक्रियेवर महापौर विनायक कोंड्याल यांचा भर…

सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आज महापौर कार्यालयात लाड कमिटी अंतर्गत निवड झालेल्या १४ उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या सोहळ्यामुळे संबंधित उमेदवारांच्या कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण ठरला.महापौर श्री. कोंड्याल यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये नागरिकांना दर्जेदार व तत्पर सेवा देण्यासाठी सक्षम मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्या दृष्टीने पात्र आणि गुणवत्ता असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. लाड कमिटीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने राबविण्यात आली असून कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता निवड करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता सामाजिक बांधिलकी म्हणून पाहावे. नागरिकाभिमुख सेवा, वेळेचे भान, शिस्त आणि प्रामाणिकपणा या मूल्यांना प्राधान्य देत आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. शहराच्या विकासात प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्त्वाचे असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करणे ही मोठी जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

या नियुक्ती प्रक्रियेत ११ बिगारी व ३ सफाई कामगार अशा एकूण १४ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले. संबंधित उमेदवारांची लवकरच विविध विभागांमध्ये कार्यानुसार नेमणूक करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास सभागृह नेते श्री. नरेंद्र काळे, गटनेते अमोल बापू शिंदे, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, उपायुक्त श्री. आशिष लोकरे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम तसेच अन्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनीही नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीचे पालन करून कार्यक्षमतेने सेवा देण्याचे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नियुक्त उमेदवारांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडला. नियुक्त उमेदवारांनीही महानगरपालिकेच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.




