स्मार्ट मीटरमुळे येणाऱ्या वाढीव वीज बिलाकडे आमदार देवेंद्र कोठे यांनी वेधले शासनाचे लक्ष
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची शासनाकडे मागणी : विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांची जनहिताच्या प्रश्नांवर मागण्यांची मालिका

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील नागरिकांना वीज पुरवठ्यासाठी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरमुळे अनेकांचे वीज बील दुप्पट, तिप्पट येत आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी गुरुवारी सभागृहात याकडे शासनाचे लक्ष वेधत यातील तांत्रिक चुका दुरुस्त करण्याची मागणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करावे, अशी आग्रही मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, गेल्या दोन महिन्यांमध्ये ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे त्यांना दुपटीने, तिपटीने बीज बिल येत आहे. त्यामुळे साहजिकच नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक ठिकाणी हे स्मार्ट मीटर सक्तीने बसवण्यात येत असल्यामुळे सोलापूरकरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांना घर भाड्याच्या दुपटीने वीज बिल आले आहे. ज्या घराचे वीज बिल दरमहा ५०० रुपये येत होते अशा घरात तब्बल १ हजार ५०० रुपये वीज बिल आले आहे. या सर्व संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाने सविस्तर स्पष्टीकरण द्यावे. स्मार्ट मीटरमध्ये तांत्रिक चुका असल्यास सरकारने हे स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यास स्थगिती द्यावी, अशी आग्रही मागणीदेखील आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. परंतु तरीही मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून स्थगिती दिली आहे. अशा अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात काम करणाऱ्या अनेक वर्षांचा तांत्रिक अनुभव असणाऱ्या अभियंत्यांना कायम करण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी सभागृहात केली.
———–
चौकट
पावसाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांची जनहिताच्या प्रश्नांवर मागण्यांची मालिका
पावसाळी अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांची जनहिताच्या प्रश्नांवर मागण्यांची मालिका दिसून येत आहे. मनपा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचे प्रश्न, अंगणवाडी मदतनीसांचे प्रश्न, अतिरिक्त हृदयरोग रुग्णवाहिकेची मागणी, सार्वजनिक आरोग्य परिचारकांचा प्रश्न, सोलापूर शहराची १ हजार ४०० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, ई बस सेवा, सोलापूर महानगरपालिकेचा जलशुद्धीकरण प्रकल्प अशा अनेक प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात आवाज उठवला आहे. विशेष म्हणजे आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या मागण्यांना संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडून ठोस आश्वासने मिळाल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे.
———–
कोट
जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेहमीच जनतेच्या हिताला प्रथम प्राधान्य देण्याची राहिलेली आहे. याच भूमिकेचे पालन करत नागरिकांना स्मार्ट मीटर सक्तीमुळे बसणारा आर्थिक भुर्दंड थांबावा याकरिता सभागृहात स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना येणाऱ्या वाढीव वीज बिलाचा मुद्दा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कुशल अभियंत्यांचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. दोन्ही मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णयाची खात्री आहे.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य



