मोफत उपचारासाठी लाचेची मागणी; मंगळवेढ्यात डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध गुन्हा लोकमत न्यूज नेटवर्क…

मंगळवेढा
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देणे बंधनकारक असताना शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील खाजगी डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर युनिटने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. २९४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींमध्ये डॉ. अरुणकुमार महिंद्रकर (वय अंदाजे ४५, खाजगी डॉक्टर) व सोमनाथ इंगळे (वय अंदाजे ३८, आरोग्य मित्र) यांचा समावेश आहे.
तक्रारदाराच्या ७२ वर्षीय आईचा पाय घसरून पडल्याने त्यांना मंगळवेढा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचाराची विनंती केली.
मात्र, संबंधित डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी १६,००० रुपयांची मागणी केली. त्यापैकी ६,००० रुपये सुरुवातीला स्वीकारून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डिस्चार्ज देण्यासाठी उर्वरित १०,००० रुपयांची मागणी करण्यात आली.
या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर २४ मार्च २०२६ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरोने पडताळणी कारवाई केली. या कारवाईत आरोपींनी १०,००० रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ५,००० रुपये घेण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
यावरून दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांकडून लाचेची मागणी होत असल्याचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
चौकट:
शासकीय कामासाठी कोणीही कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी तात्काळ अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.



