“वचनपूर्ती करणारा आणि विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प” – आमदार देवेंद्र कोठे…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा दिलेल्या वचनांची पूर्तता करणारा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येत असून, कृषी आणि उद्योग क्षेत्राला मोठी चालना देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याची उद्योग अर्थव्यवस्था १२ पटींनी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्राला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे ध्येय या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक उदयोन्मुख जिल्ह्यात औद्योगिक समूह उभारणे, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे तसेच चार लाख नोकऱ्यांच्या संधी निर्माण करण्याचा निर्धार सरकारने व्यक्त केला आहे. याशिवाय एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पाच लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून यामुळे उद्योग विस्ताराला तसेच शेती आणि शेतीपूरक उद्योगांना मोठी चालना मिळणार असल्याचे आमदार कोठे यांनी नमूद केले.
सोलापूर हे औद्योगिक शहर असल्यामुळे या अर्थसंकल्पाचा जिल्ह्याच्या विकासाला विशेष लाभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, उद्योग, रोजगार आणि ग्रामीण विकासाला गती देत विकसित महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प आहे.



