नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांची प्रशासनासह प्रभाग २३ मध्ये पाहणी

सोलापूर
प्रभाग क्रमांक २३ मधील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी मा. उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह प्रभागातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.
सेंट थॉमस शाळा, नागू-नारायणवाडी, अक्षत फार्म, मशाळ वस्ती, पंचमुखी चौक तसेच प्रभागातील विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, उद्यान, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन यासंदर्भातील समस्या जाणून घेण्यात आल्या.
नागरिकांच्या तक्रारी केवळ तात्पुरत्या स्वरूपात न सोडवता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश उपमहापौरांनी दिले.
नागरिकांच्या समस्या निदर्शनास येताच उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभागात प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पाणीपुरवठा, नगर अभियंता, उद्यान, रस्ते, ड्रेनेज, विद्युत, घनकचरा व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी पाहणीसाठी उपस्थित होते.

सध्या गणेशोत्सव व विविध उत्सवांचा माहोल असल्याने प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश उपमहापौरांनी संबंधित विभागांना दिले. तसेच प्रलंबित कामांचा सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने प्रशासनाने कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
या पाहणीदरम्यान उद्यान व मंडई सभापती राजशेखर पाटील, विधी व न्याय समिती सभापती सत्यजित वाघमोडे, पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर, श्रीनिवास बुरुडकर, विभागीय कार्यालय क्रमांक ६ चे अधिकारी पानगल, विद्युत विभागाचे इंगळे, कनिष्ठ अभियंता शेफाली, कनिष्ठ अभियंता वाघ, कनिष्ठ अभियंता पूजा चव्हाण, कनिष्ठ अभियंता देवकर, विद्युत विभागाच्या पूजा देशमाने, आरोग्य निरीक्षक ढुढे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

“नागरिकांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन निराकरण करून प्रभागातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर आपला भर आहे. उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने समन्वयाने व तत्परतेने काम करावे,” असे मा. उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
नागरिकांच्या समस्यांवर तातडीने कार्यवाही आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा — हाच प्रभाग २३ च्या विकासाचा संकल्प!



