अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
अॅम्फी थिएटर रसिक श्रोत्यांनी तुडुंब भरले

चिमुकल्या श्रावस्ती माळशिकारेकडून बालगीत सादर
सोलापूर, (प्रतिनिधी):-
सुंदर ते ध्यान या भावगीताने सुरूवात करण्यात आलेल्या ज्येष्ठ संगितकार श्रीनिवास खळे यांच्या संगीतबध्द करण्यात आलेल्या अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीताने अॅम्फी थिएटर मंत्रमुग्ध झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि वेणुगोपाल संगीतालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्धी निमित्त सूर काही राहिले या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले, त्यानंतर सर्व कलावंताचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल धाबळे यांनी केले तर आभार प्रकाश मोकाशे यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर उपस्थित होते.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जय जय रामकृष्ण हरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, भेटी लागी जिवा या भावगीत आणि भक्तीगीतासोबतच गोरी गोरी पान फुलासारखी छान, चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी, किलबील किलबील पक्षी बोलती, शाळा सुटली पाटी फुटली या सारखे बालगीते श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केली असून त्याचे सादरीकरण वेणुगोपाल संगीतालयच्या कलावंतानी केले. गायक रूपक झंकार कुलकर्णी, पियुष आवारे, स्वरदा मोहोळकर, रमा कुलकर्णी, श्रावस्ती माळशिखरे, माऊली जोशी यांनी आपल्या सुमुधूर आवाजातून सादर केले. त्यांना तबला झंकार कुलकर्णी, कौस्तुब चांगभले तर केदार गुळवणी हे व्हायोलीन आणि बासरी जयेश कुलकर्णी यांनी साथ दिली तर संगीत संयोजन शर्वरी कुलकर्णी यांनी केले आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन आदिती कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ तबलावादक आनंद बदामीकर, गझल गायक अतुल बेले, नाट्यकलावंत वनिता म्हैसकर, पद्माकर कुलकर्णी, प्रिसिजनच्या सुहासिनी शहा यांच्यासह रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.




