४८ तासांत आंतरराज्यीय घरफोडी करणारा अट्टल आरोपी जेरबंद…
८.२ तोळे सोनं, ३० तोळे चांदी, रोख रक्कम व कारसह ८.७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सोलापूर
शहर गुन्हे शाखेने आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या अट्टल आरोपीला अवघ्या ४८ तासांत जेरबंद करत मोठी कामगिरी बजावली आहे. आरोपीकडून ८.२ तोळे सोन्याचे दागिने, ३० तोळे चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ८ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेवती सिद्धेश्वर वाघोलीकर (वय ६३, रा. गीतानगर, मंगळमूर्ती रेसिडेन्सी, जुळे सोलापूर) या ११ मे रोजी घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे ९ लाख ५७ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेण्यात आला.
१५ मे रोजी मध्यरात्री मार्केट पोलीस चौकीसमोर सार्वजनिक रस्त्यावर संशयित स्विफ्ट कार आढळून आली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारमधील इसमाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर (वय ४८, रा. सरवनगर कॉलनी रोड नं. १, नागरम केसरी नगर, जि. मेदक, तेलंगणा राज्य) असे असल्याचे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. आरोपीने सोलापूरातील घरफोडीची कबुली दिली असून त्याच्यावर विविध राज्यांत तब्बल १५ घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त गोहर हसन, सहायक पोलीस आयुक्त अर्चना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचारी नरेंद्र गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साबळे, अभिजय माने, काशिनाथ वाघे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे तसेच सायबर पथकातील पोलिसांनी सहभाग घेतला.



