१ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ९५० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त प्रकरणी रिजवान शब्बीर खान यास न्यायालयीन कोठडी तर साहिल पीरजादे यास आणखी दोन दिवस वाढीव पोलीस कोठडी…

सोलापूर
मोदी कब्रस्थान येथे १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ९५० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी रिजवान शब्बीर खान यास न्यायालयीन कोठडी तर साहिल पीरजादे यास दोन दिवस वाढीव पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मे. स्पेशल जज (श्री. सुरवसे सो) यांनी दिले.
यात हकिकत अशी की, १ कोटी ९० लाख रुपये किमतीचे ९५० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ व १० लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा कार जप्त करण्यात आली असून एकूण २ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एका महिलेसह आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी शहर गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व त्यांचे पथक सोलापूर शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या एका हुंडाई क्रेटा कारमध्ये अमली पदार्थाचा साठा आहे.माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित वाहनाला घेराव घातला. वाहनातील व्यक्तीची चौकशी केली असता त्याचे नाव रिजवान शब्बीर खान (वय २६, रा. अंबिका नगर भाग-३, नई जिंदगी, सोलापूर) असे असल्याचे निष्पन्न झाले.कारच्या ड्रॉवरमध्ये सापडली एमडी पावडर वाहनाची झडती घेतली असता ड्रायव्हिंग सीटच्या डाव्या बाजूच्या ड्रॉवरमध्ये राखाडी रंगाच्या प्लास्टिक पिशवीत पांढऱ्या रंगाचा स्फटिक स्वरूपातील पदार्थ आढळून आला.त्यानंतर फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात आली असता सदर पदार्थ मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार पंचनामा करून पुढील कारवाई केली.
अमली पदार्थ कुणाकडून आणला?पोलिसांच्या चौकशीत आरोपी रिजवान खान याने हा अमली पदार्थ साहील सिकंदर फिरजादे (रा. सोलापूर) आणि अफजल मुर्शीद (रा. मुस्लिम कब्रस्तानजवळ, सोलापूर) यांच्याकडून मिळाल्याची माहिती दिली. तसेच हा साठा कारच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आल्याचेही सांगितले.या प्रकरणात पोलिसांनी रिजवान शब्बीर खान (वय २६, नई जिंदगी, सोलापूर) साहील सिकंदर फिरजादे (वय २५, अलमश अपार्टमेंट, मंत्रीचंद नगर, सोलापूर)यांना अटक केली होती.
तद्नंतर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात पोलीस कोठडी संपल्याने दोन्ही आरोपींना आज रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रिजवान खान यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे व साहिल पीरजादे यास दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.
यात आरोपी रिजवान खान तर्फे अँड. शैलेश पोटफोडे तर सरकार पक्षातर्फे अँड. दत्तूसिंह पवार हे काम पाहत आहेत.



