सोलापूर महापालिकेत दर सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्याची मागणी…

सोलापूर
सोलापूर : पर्यावरण संरक्षण, इंधन बचत, वायू प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये दर सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक ७-बच्या नगरसेविका श्रद्धा किरण पवार यांनी केली आहे.
यासंदर्भात नगरसेविका श्रद्धा पवार यांनी महापौर, सभागृह नेते आणि महापालिका आयुक्त यांना पत्र देऊन सोलापूर महानगरपालिकेतील सर्व कॅबिनेट सदस्य, नगरसेवक-नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी वाहनांचा वापर टाळून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती केली आहे.
भारताचे पंतप्रधान Narendra Modi यांनी दिलेल्या पर्यावरण संरक्षणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. वाढते प्रदूषण, इंधनाचा वाढता वापर आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे श्रद्धा पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होईल तसेच सार्वजनिक वाहतूक आणि पर्यायी पर्यावरणपूरक साधनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, महापौर, आयुक्त आणि सभागृह नेते यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत सहमती दर्शविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात सोलापूर महानगरपालिकेमध्ये ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम प्रत्यक्षात राबविला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



